बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 04:36 PM2024-11-28T16:36:55+5:302024-11-28T16:38:10+5:30
Bachchu Kadu : एकनाथ शिंदे यांनी माझ्याशी संपर्क केला आणि निवडणुकीबाबत माहिती घेतली, असे बच्चू कडू म्हणाले.
अमरावती : राज्यात नुकतीच विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीशी थेट लढत असलेल्या महाविकास आघाडीचा धक्कादायक पराभव झाला. तर तिसरी आघाडी उघडलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनाही पराभवाचा धक्का बसला. अचलपूर विधानसभा मतदारसंघातून बच्चू कडू यांचा पराभव झाला. दरम्यान, पराभवानंतर एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता, त्यांनी विचारपूस केली, असे बच्चू कडू यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी माझ्याशी संपर्क केला आणि निवडणुकीबाबत माहिती घेतली, असे बच्चू कडू म्हणाले. तसेच, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मला खूप कॉल आले, त्यामुळे आम्ही जनतेकडून अभिप्राय घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. गेल्या २० वर्षात लाखांपेक्षा अधिक लोकांच्या आम्ही शस्त्रक्रिया केल्या आहेत, कामात आम्ही महाराष्ट्रात अव्वल आहोत. पण, मुस्लिमांचा फतवा आणि कंटेंगे तो बटेंगे, यामुळे आमचा सेवेचा झेंडा हरला आहे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.
दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने अमरावती जिल्ह्यातील राणा आणि कडू यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. राणा दाम्पत्याने बच्चू कडूंना पाडण्यासाठी काम केल्याने बच्चू कडू यांचा पराभव झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, माझ्या पराभवाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न राणांनी करू नये, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. मला पाडण्याची राणांची लायकी नाही, अशी घणाघाती टीका बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यांवर केली.
माझा पराभव त्यांनी करावा, एवढी राणा दाम्पत्याची औकाद नाही, असे म्हणत कोणताही मतदारसंघ निवडा तुम्ही बिगर पार्टीचे आणि मी बिगर पार्टीचा, असे थेट आव्हान बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला दिले. तसेच, व्हीएमच्या जागी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या आणि आजमावून घ्या. खरे मर्द असाल तर पुन्हा निवडणूक घ्या, आत्ताच सांगावं राणांनी पाच वर्षे कशासाठी थांबता, अशा शब्दांत बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्यावर निशाणा साधत आव्हान दिले आहे.
बच्चू हटाव हा नारा लोकांनीच दिला - रवी राणा
आम्हाला श्रेय घेण्याची गरज नाही, लोकांनी त्यांना हटवलं आहे. बच्चू हटाव हा नारा लोकांनीच दिला, असे म्हणत रवी राणा यांनी बच्चू कडूंवर हल्लाबोल केला. बच्चू कडू म्हणाले होते की, मुख्यमंत्री होईन पण त्यांनी आता बोलणे बंद करायला हवं. पाच वर्षानंतर मी बच्चू कडू यांचे आव्हान स्वीकारेन, ते सांगतील तिथे मी उभा राहीन, असे सांगत बच्चू कडू यांचे आव्हान रवी राणा यांनी स्वीकारले आहे.