बच्चू कडूंची अधिकाऱ्यास मारहाण

By Admin | Published: March 30, 2016 12:53 AM2016-03-30T00:53:04+5:302016-03-30T00:53:04+5:30

अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंगळवारी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव बी. आर. गावित यांना मंत्रालयातील त्यांच्या कक्षात मारहाण केल्याने, संतप्त

Bachu kadoo jumped the officer | बच्चू कडूंची अधिकाऱ्यास मारहाण

बच्चू कडूंची अधिकाऱ्यास मारहाण

googlenewsNext

मुंबई: अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंगळवारी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव बी. आर. गावित यांना मंत्रालयातील त्यांच्या कक्षात मारहाण केल्याने, संतप्त झालेल्या मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले.
सार्वजनिक बांधकाम खात्यातील कर्मचारी अशोक जाधव यांना वांद्रे येथील शासकीय निवासस्थान आणखी वर्षभरासाठी देण्याच्या मागणीसाठी कडू हे जाधव यांना घेऊन गावित यांच्याकडे गेले होते. त्या वेळी कडू-गावित यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. कडू यांनी गावित यांच्या कानशिलात लगावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी ‘लोकमत’ला सांगितले. गावित यांनीही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तशी तक्रार केली आहे. दुपारी दीड वाजता मारहाणीची घटना घडली. कडू यांनी गावितांना अर्वाच्य शिवीगाळ करून मारहाण केल्याचे अधिकारी महासंघाचे नेते ग. दि. कुलथे आणि समीर भाटकर यांनी सांगितले. बुधवारीही आंदोलन सुरू राहील, असे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)

अजामीनपात्र गुन्हा
गावित यांच्या तक्रारीवरून मरिन ड्राइव्ह पोलिसांनी भादंवि ३३२, ३५३ आणि ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक पोपट यादव यांनी दिली. हा अजामीनपात्र गुन्हा असल्याने लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी वर्तवली आहे.

कडू यांचा मात्र इन्कार : कडू यांनी मात्र मारहाणीचा इन्कार केला. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले की, ‘मी वाद घातला, पण मारले नाही. गावित हे माझ्याशी उद्दामपणे बोलत होते. तुम्ही काय ते मुख्यमंत्र्यांशी बोला, असे ते म्हणत होते,’ असल्याचा आरोप कडू यांनी केला आहे.

- मारहाणीचा महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानेही निषेध व्यक्त केला आहे.

अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टद्वारे कारवाई करा
- मंत्रालयातील उपसचिव गावित यांना शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांना अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टखाली अटक करण्याची मागणी, महाराष्ट्र राज्य ओबीसी कास्ट्राइब कर्मचारी महासंघाने मंगळवारी केली आहे. मरिन ड्राइव्ह पोलिसांनी या प्रकरणी मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
- गावित हे अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्याने,
कडू यांच्याविरोधात अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी महासंघाचे अध्यक्ष राजेश सोनवणे यांनी केली आहे.
- मारहाण प्रकरणाची मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय हे चौकशी करतील आणि त्यांनी दिलेल्या अहवालावर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत सांगितले. अधिकाऱ्याला मारहाण करणे अजिबात योग्य नाही, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी हा प्रकार निषेधार्ह असल्याचे सांगितले.
- कडू यांनी गावित यांना मारहाण केल्याची बाब मंत्रालयात वाऱ्यासारखी पसरली. नवीन इमारतीच्या मधल्या जागेत काही वेळातच शेकडो कर्मचारी जमा झाले आणि त्यांनी घोषणाबाजी केली. मारहाणीच्या प्रकाराने प्रचंड तणावाखाली असल्याने गावित यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

Web Title: Bachu kadoo jumped the officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.