राजकारण विभागात आमदार बच्चू कडू ठरले "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर"

By Admin | Published: April 11, 2017 09:40 PM2017-04-11T21:40:18+5:302017-04-11T22:12:28+5:30

संपूर्ण महाराष्ट्रात लढवय्ये आमदार अशी ओळख असलेले ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांना यंदाच्या राजकारण विभागातील लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्कार जाहीर झाला आहे.

"Bachu", "Lokmat Maharashtrian Of The Year" | राजकारण विभागात आमदार बच्चू कडू ठरले "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर"

राजकारण विभागात आमदार बच्चू कडू ठरले "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर"

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 11 - संपूर्ण महाराष्ट्रात लढवय्ये आमदार अशी ओळख असलेले ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांना यंदाच्या राजकारण विभागातील लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्कार जाहीर झाला आहे. व्होडाफोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील सूद आणि डॉ.उल्हास पाटील यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
नागरीकांचे प्रश्न सोडवताना प्रशासकीय अधिका-यांनी दिरंगाई किंवा हेतुपुरस्सर नियम आडवे आणले की, त्या अधिका-यांच्या अंगावर हात टाकण्यास मागेपुढे न पाहणारा आमदार म्हणजे बच्चू कडू. राजकारण विभागात आशिष शेलार, पुनम महाजन, अनिल परब आणि संभाजी निलंगेकर यांना नामांकने मिळाली होती. पण आमदार बच्चू कडू यांनी बाजी मारली. मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये हा कार्यक्रम सुरु आहे. आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने समाजाला दिशा आणि प्रेरणा देण्याचा वसा घेतलेल्या सेवाव्रतींचा गौरव करण्याच्या "लोकमत"च्या संकल्पाचे चौथे पर्व यंदा साकारत आहे. 
 
युपीएएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे.
(सुधीर मुनगंटीवार ठरले सर्वात प्रभावी राजकारण्यांमधील "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर")
(विकासाला विवेकाची जोड हवी - प्रल्हाद पै)
(...तर आठवले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी)
 
हा सोहळा थेट पाहा फेसबुकवर...
 
facebook.com/lokmat
 
ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांची थोडक्यात माहिती
 
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघाचे लढवय्ये आमदार अशी राज्यभर ओळख. रुग्णसेवा हा आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा स्थायीभाव. शोषित, पीडितांच्या मदतीला धावून जाणे. अपंगांचे प्रश्न, समस्या सोडविताना प्रशासकीय अधिका-यांनी दिरंगाई किंवा हेतुपुरस्सर नियम आडवे आणले की, त्या अधिका-यांच्या अंगावर हात टाकण्यास मागेपुढे न पाहणारा आमदार म्हणजे बच्चू कडू . अचलपूर विधानसभा मतदारसंघातून ‘हॅटट्रिक’ करून बच्चू कडूंनी प्रस्थापितांचे राजकारण गुंडाळले. बच्चू कडू हे मुळात शिवसैनिक. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीने भारावून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. चांदूरबाजार पंचायत समितीचे त्यांनी १९९७ मध्ये सभापतीपद भूषविले. अन्याय, अत्याचार यांच्या विरोधात सतत रण पेटविण्याची मानसिकता. त्यामुळे निकृष्ट शौचालय निर्मितप्रकरणी त्यांनी आंदोलन करून राज्यभराचे लक्ष वेधले होते. दरम्यान, शिवसेनेला ‘रामराम’ ठोकून त्यांनी "प्रहार" संघटना स्थापन केली. विधानसभेची पहिली निवडणूक अपक्ष म्हणून सन १९९९ मध्ये लढविली. यात थोड्या मताने त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर, २००४ मध्ये विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले. अपक्ष विजयी होण्याचा मान त्यांना मिळाला. सलग तीनदा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. बच्चू कडूंनी २००४ मध्ये लोकसभेची निवडणूक लढविली होती. यात त्यांचा पराभव झाला. आंदोलन करणारा आमदार अशी छबी आ.कडूंची आहे. अमेठी येथे चार वर्षांपूर्वी त्यांचे आंदोलन गाजले. नागपुरात जलकुंभावर वीरूगिरी. अमरावती जिल्ह्यात नांगरवाडी येथे अन्नत्याग आंदोलन, अंपगांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी सीएसटी रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलनातून ‘मेगा ब्लॉक’ केले. विधिमंडळात शेतकरी प्रश्न सोडविण्यासाठी स्वामिनाथन आयोग लागू करावा, शकुंतला एक्स्प्रेस पुनर्जीवित करावी, अपंगांना नियमानुसार रोजगार, नोकरी, शिक्षण, भरतीप्रक्रियेत ३ टक्के आरक्षणाची मागणी, शेतमालाला भाव, विदर्भ फिनले मिल सुरू व्हावी, रस्ते चौपदीकरणासाठी भरीव निधी खेचून आणला. विकास करताना शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, सामान्यांवर अन्याय झाल्यास, त्यांना न्याय देण्याची भूमिका आ. बच्चू कडूंनी घेतली आहे. लक्षवेधी आंदोलन करणारा आमदार कडू अशी त्यांची सर्वदूर ओळख आहे. वीरूगिरी, भाला, अर्धदफन, रेले रोको आंदोलनातून प्रश्न सोडविण्यात त्यांना यश आले आहे. अस्सल ग्रामीण भाषेचे संभाषण ही आ. कडूंची खासियत आहे. ‘आपला माणूस’ अशी त्यांची छाप असून, जनतेच्या विश्वासावर खरे उतरणा-या बच्चू कडूंनी कार्यकर्ता असल्यामुळेच अपक्ष म्हणून तीनदा आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम नोंदविला आहे.
या भूमीशी ज्यांनी रक्ताचे आणि घामाचे नाते जोडले, ज्यांनी आपले आयुष्य इथल्या समृद्धीसाठी वेचले, अशा महाराष्ट्रीयनांचा सन्मान करण्यासाठी "लोकमत"ने सुरू केलेल्या पुरस्काराची एव्हाना परंपरा झाली आहे. "लोकमत"च्या संपादकीय चमूने केलेले मंथन, जगभरातील कोट्यवधी वाचक तसेच नामवंत ज्युरींचा कौल यातून विजेत्यांची निवड साकारत आहे. १४ क्षेत्रांमधील प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या मान्यवरांप्रमाणेच राज्याच्या कानाकोपऱ्यात इतरांना प्रेरणादायी ठरेल, अशा कार्याचे बीज पेरणाऱ्यांचाही शोध या निमित्ताने घेतला गेला. समाजमनावर प्रभाव टाकणाऱ्या तसेच विकास आणि समृद्धीच्या वाटचालीत भर टाकलेल्या नानाविध क्षेत्रांमधील प्रतिभेचा आरसा म्हणून युपीएल प्रायोजित "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्कारांकडे पाहिले जात आहे.
 
ज्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले, इथल्या मातीची शान वाढविली आणि इथे प्रगती घडवून आणली अशा १४ क्षेत्रांतील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी लोकमतने उचललेले पाऊल हे आता केवळ सोहळा नव्हे, तर गौरवशाली परंपरा बनू पाहात आहे.
 
लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या यंदाच्या चौथ्या पर्वातील विजेते ठरविण्याची मोलाची कामगिरी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या ११नामांकित ज्युरींनी पार पाडली आहे. जाहीर झालेली नामांकने, त्यावर जगभरातील वाचकांनी भरभरून दिलेली मते या पार्श्वभमीवर तब्बल साडेतीन तासांच्या विचार मंथनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ११ नामवंत ज्युरींनी विजेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. 
 
‘लोकमत’ने केलेल्या मंथनातून जाहीर झालेली १४ कॅटेगरीतील नामांकने आणि लोकमताचा कौल यावर अंतिम निवडीचा साज चढविण्याची जबाबदारी आनंदाने पार पाडणाऱ्या ज्युरी मंडळात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, डॉ. प्रकाश आमटे, अर्णव गोस्वामी, मिलिंद देवरा, महेश भट्ट, विक्रम लिमये, विक्रम श्रॉफ, सुनील सूद, डॉ. रमाकांत पांडा, विजय दर्डा आणि मृणाल कुलकर्णी यांचा सहभाग आहे.
 
यंदा मोलाची भर...: आता चौथ्या पर्वात "लोकसेवा-समाजसेवा", "परफॉर्मिंग आर्ट्स", "कला", "क्रीडा", रंगभूमी, मराठी चित्रपट, "उद्योग", ‘पायाभूत सेवा’, "राजकारण", "प्रशासन (आश्वासक)" यातील एकंदर १३ कॅटेगरींसह "वैद्यकीय" क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या १४ पुरस्कारांच्या व्यतिरिक्त स्पर्धेच्या पलीकडे जाणारे उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केलेल्या सहा महनीय व्यक्तींना विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.
 
नामांकन प्राप्त व्यक्तींना जगभरातील वाचकांनी लोकमतच्या वेबसाइटवर मतदानाद्वारे दिलेली पसंती तसेच ११ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. तब्बल दोन दशलक्ष वाचकांनी या मतदानात सहभागी होत १४  कॅटेगरीतील नामांकनांसाठी दीड कोटी मते नोंदविली.
 
सर्व पुरस्कारांच्या माहितीसाठी क्लीक करा
 
lmoty.lokmat.com

Web Title: "Bachu", "Lokmat Maharashtrian Of The Year"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.