बाबा आढाव यांचे उपोषण मागे
By admin | Published: October 8, 2016 04:09 AM2016-10-08T04:09:05+5:302016-10-08T04:09:05+5:30
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती या मागण्यांसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी सुरू केलेले उपोषण शुक्रवारी सहाव्या दिवशी मागे घेतले.
पुणे : शेतमालाला हमीभाव व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती या मागण्यांसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी सुरू केलेले उपोषण शुक्रवारी सहाव्या दिवशी मागे घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागण्यांना तत्त्वत: मान्यता दिल्याचे गुरुवारी स्पष्ट केले होते. त्यानुसार डॉ. आढाव यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा बेमुदत आंदोलन सुरू करण्याचा इशारा त्यांनी या वेळी दिला.
डॉ. आढाव यांनी महात्मा गांधी जयंतीपासून उपोषणाला सुरुवात केली होती. गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी दूरध्वनीवरून डॉ. आढाव यांच्याशी चर्चा केली. दोन्ही मागण्या तत्त्वत: मान्य असल्याचे त्यांना सांगण्यात आले. बापट यांचे तसे पत्रही डॉ. आढाव यांना देण्यात आले. त्यानुसार उपोषणावर निर्णय घेण्यास शुक्रवारी सकाळी सभा बोलाविण्यात आली होती. राज्य शासनातर्फे कृषी आयुक्त विकास देशमुख या वेळी उपस्थित होते. देशमुख यांनी दिलेले नारळपाणी पिऊन आढाव यांनी उपोषण सोडले. (प्रतिनिधी)
>शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर आहे, असे मानतो. पण जर मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द फिरवला तर आता जेवढे आयुष्य उरले आहे, तेवढे या चळवळीसाठी लढेन. तीन लाख शेतकरी आत्महत्या करतात तरी शासन हालत नाही. याविषयी घोषणा करण्याखेरीज उपाययोजना होत नाही ही शरमेची बाब आहे.
- डॉ. बाबा आढाव