एसी बसमधील पॅन्ट्री कारचा प्रस्ताव मागे

By admin | Published: June 14, 2016 03:42 AM2016-06-14T03:42:44+5:302016-06-14T03:42:44+5:30

एसटी महामंडळाने स्वत:च्या एसी बसमध्ये पॅन्ट्री कार बसविण्याचा प्रस्ताव बासनात गुंडाळला आहे. स्कॅनिया कंपनीच्या दोन एसी बस मुंबई एअरपोर्ट ते पुणे मार्गावर चालविण्यात येणार होत्या

Back to the offer of a pantry car in the AC bus | एसी बसमधील पॅन्ट्री कारचा प्रस्ताव मागे

एसी बसमधील पॅन्ट्री कारचा प्रस्ताव मागे

Next

मुंंबई : एसटी महामंडळाने स्वत:च्या एसी बसमध्ये पॅन्ट्री कार बसविण्याचा प्रस्ताव बासनात गुंडाळला आहे. स्कॅनिया कंपनीच्या दोन एसी बस मुंबई एअरपोर्ट ते पुणे मार्गावर चालविण्यात येणार होत्या आणि त्यात पॅन्ट्री कारची सुविधा देण्यात येणार होती. मात्र त्यासाठी होणाऱ्या खर्चाच्या प्रमाणात प्रवाशांचा प्रतिसाद कितपत मिळेल, याविषयी साशंकता असल्याने प्रस्ताव
मागे घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
एसटी महामंडळाने स्कॅनिया कंपनीच्या ३७ आणि व्होल्वो कंपनीच्या ३३ एसी बस काही महिन्यांपूर्वी विकत घेतल्या. यातील व्होल्वो कंपनीच्या सर्व बस दाखल झाल्या आहेत, तर स्कॅनिया कंपनीच्या बस टप्प्याटप्प्यात दाखल होत आहेत. सध्या १५0 पेक्षा जास्त एसी बस एसटीच्या ताफ्यात असून मुंबई-पुणे, ठाणेसह काही महत्त्वाच्या मार्गांवरच त्या धावत आहेत. नव्याने दाखल झालेल्या स्कॅनिया कंपनीच्या बसपैकी दोन बसममधील अंतर्गत सजावटीत बदल करत त्या बसमध्ये पॅन्ट्री कारची सुविधा देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या बस महामंडळाने ठरविलेल्या मुंबई एअरपोर्ट ते पुणे मार्गावर चालविण्यात येणार होत्या. मात्र अंतर्गत सजावटीसह पॅन्ट्री कारसाठी सुमारे ७० लाख रुपये खर्च होणार होता. या बसला प्रतिसाद न मिळाल्यास हा खर्चही वाया जाण्याचा अंदाज बांधत प्रस्ताव मागे घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
खासगी कार्यालयांत काम करणाऱ्यांसाठी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स ते बोरीवली अशी एसी बस सेवा काही वर्षांपूर्वी सुरू केली होती. मात्र त्याला प्रतिसादच न मिळाल्याने ही सेवा काही महिन्यांतच बंद करण्यात आली. त्यामुळे मुंबई एअरपोर्ट ते पुणे अशी नवीन एसी सेवा सुरू करताना या नवीन मार्गाला आणि पॅन्ट्री कार सुविधेला कितपत प्रतिसाद मिळेल, याबाबत सांशकता असल्याने महामंडळाने या मार्गाचा प्रस्तावही गुंडाळला. (प्रतिनिधी)

नवीन एसी बसमध्ये पॅन्ट्री कार बसविण्यात येणार नाही. हा प्रस्ताव मागे घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मुंबई एअरपोर्ट-पुणे या नवीन मार्गाचा प्रस्तावही नसून आमच्याकडून काही अन्य मार्गांवर एसी बस सुविधा देण्याचा विचार आहे.
- रणजित सिंह देओल, एसटी महामंडळ-उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

Web Title: Back to the offer of a pantry car in the AC bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.