राज्यातील वाहतूकदारांचा संप मागे
By admin | Published: April 30, 2015 09:57 AM2015-04-30T09:57:35+5:302015-04-30T11:18:26+5:30
रस्ते वाहतूक सुरक्षा विधेयकाच्या विरोधात सार्वजनिक वाहतूक संघटनांनी पुकारलेल्या संपातून राज्यातील संघटनांनी माघार घेतला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.३० - रस्ते वाहतूक सुरक्षा विधेयकाच्या विरोधात सार्वजनिक वाहतूक संघटनांनी पुकारलेल्या संपातून राज्यातील संघटनांनी माघार घेतला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नवीन विधेयक राज्यात लागू करणार नाही असे आश्वासन दिल्यानंतर संघटनांनी संपातून माघार घेतल्याने राज्यभरातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
गुरुवारी देशभरात सार्वजनिक उपक्रमातील परिवहन कामगारांनी एक दिवसांचा संप पुकारला असून राज्यातही या संपाचे पडसाद दिसत होते. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात या संपाला अल्प प्रतिसाद मिळाला असला तरी राज्यातील अन्य भागांमध्ये एसटी बस बंद असल्याने ऐन सुट्टीच्या दिवसांत प्रवाशांचे हाल होते. याप्रश्नावर गुरुवारी सकाळी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या निवासस्थानी राज्यभरातील वाहतूकदार संघटनांचे पदाधिकारी, बेस्ट व एसटीचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीत रावतेंनी एसटीचे खासगीकरण करणार नाही असे आश्वासनही दिल्याचे समजते. रावतेंच्या आश्वासनानंतर राज्यभरातील वाहूतदार संघटनांनी संप मागे घेतल्याचे घोषणा केली आहे.