परतीच्या पावसाने गावे झाली टँकरमुक्त!
By admin | Published: October 20, 2016 01:22 AM2016-10-20T01:22:16+5:302016-10-20T01:22:16+5:30
जिल्ह्यात चांगला पाऊस पडूनही बारामती, दौैंड व पुरंदर या तालुक्यांतील टँकर सुरूच होते.
पुणे : या वर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस पडूनही बारामती, दौैंड व पुरंदर या तालुक्यांतील टँकर सुरूच होते. आॅगस्टअखेर ३५ टँकरनी पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, सप्टेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्यातील टँकर संपवले असून, आता फक्त बारामतीत एका गावासाठी दोन टँकर सुरू आहेत.
या वर्षी मे, जून महिन्यांत जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई होती. १४७ टँकरनी पाणीपुरवठा सुरू होता. जिल्ह्यात मावळ वगळता सर्वच तालुक्यांत टँकर सुरू करण्याची वेळी प्रशासनावर आली होती. जूनअखेर हे टँकर थोडे कमी होऊन वेल्हा, मुळशी व मावळ तालुका वगळता जिल्ह्यात सर्वत्र १२८ टँकरनी पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, जुलै व आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे झपाट्याने टँकर कमी होऊन ३५वर आले होते. बारामती, दौैंड व पुरंदर या तीन तालुक्यांतच पाणीटंचाई होती. त्यात सर्वाधिक २० टँकर बारामती तालुक्यता असून, पुरंदर १० व दौैंड तालुक्यात ५ टँकर सुरू होते.
३५ टँकर मेअखेरपर्यंत सुरू राहतील अशी शक्यता होती; मात्र सप्टेंबर महिन्यात परतीचा पाऊस सुरू झाला. या पावसाने विशेषत: टंचाईसदृश तालुक्यांवर कृपावृष्टी केली. त्यामुळे येथील पाणीटंचाई कमी झाली. शेतीलाही चांगला फायदा झाला. परिणामी, इंदापूर तालुक्यात ६ आॅगस्ट, पुरंदर तालुक्यातील टँकर ५ आॅक्टोबरपासून बंद करण्यात आले आहेत.
आजमितीला जिल्ह्यात फक्त २ टँकर सुरू असून, तेही बारामतीतील एक गाव व ११ वाड्यावस्त्यांवर सुरू आहेत. येथील ४ हजार ६६१ लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
>जिल्ह्यात सरासरी १०१२.१ मि.मी. पाऊस
जिल्ह्यात आजअखेर एकूण १३,१५७.५ मि.मी एवढा पाऊस झाला असून, तो सरासरी १०,१२.१ मि.मी आहे. १ जूनपासून हवेली ४०९.८ , मुळशी २,०८४.४, भोर १,८६६.४, मावळ २,३५४.५, वेल्हा १,८२२.४, जुन्नर १,१०९.१, खेड ८००, आंबेगाव ६७९.६, शिरूर ४१९, बारामती ४३८.९, इंदापूर ४६९.५, दौंड ४३२.४ आणि पुरंदर २७१.६ मिलिमीटर पाउस झाला आहे.
>खालील गावांमध्ये या दिवसांपासून टँकर बंद झाले आहेत़
>तालुकादिनांक
आंबेगाव0३ आॅगस्ट
भोर0२ जुलै
दौैंड२७ सप्टेंबर
हवेली0६ जुलै
इंदापूर0६ आॅगस्ट
जुन्नर२६ जुलै
खेड२७ जुलै
मावळएकही टँकर नाही
पुरंदर0५ आॅक्टोबर
शिरूर0४ आॅगस्ट
वेल्हा२९ जून