विदर्भातील मंत्रिपदांचा ‘बॅकलॉग’ वाढला; उरली फक्त पाच मंत्रिपदं

By यदू जोशी | Published: April 7, 2021 01:13 AM2021-04-07T01:13:15+5:302021-04-07T06:53:38+5:30

दोन कॅबिनेट मंत्र्यांचे राजीनामे; मुंबईला सात कॅबिनेट मंत्रिपदे

The backlog of ministerial posts in Vidarbha has increased having leaving only five ministerial posts | विदर्भातील मंत्रिपदांचा ‘बॅकलॉग’ वाढला; उरली फक्त पाच मंत्रिपदं

विदर्भातील मंत्रिपदांचा ‘बॅकलॉग’ वाढला; उरली फक्त पाच मंत्रिपदं

Next

- यदु जोशी

मुंबई : अनिल देशमुख आणि संजय राठोड या दोन कॅबिनेट मंत्र्यांनी राजीनामे दिल्याने आता महाविकास आघाडी सरकारमधील वैदर्भीय मंत्रिपदांचा ‘बॅकलॉग’ वाढला आहे. मंत्रिमंडळात विदर्भातून आता फक्त चार कॅबिनेट, तर एक राज्यमंत्री आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्रिपदासह अनेक महत्त्वाची खाती विदर्भाकडे होती. उद्धव ठाकरे सरकारमध्ये पश्चिम विदर्भाकडे (अमरावती विभाग) दोन कॅबिनेट मंत्रिपदे व एक राज्यमंत्रिपद आहे. पूर्व विदर्भाकडे (नागपूर विभाग) तीन कॅबिनेट मंत्रिपदे आहेत. देशमुख, राठोड यांच्या राजीनाम्यामुळे दोन्ही विभागातील एकेक कॅबिनेट मंत्रिपद गेले. नाना पटोेले यांच्याकडे विधानसभेचे अध्यक्षपद होते. त्यांनी राजीनामा दिला व ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यामुळे आणखी एक महत्त्वाचे पद विदर्भाच्या हातून गेले. अनिल देशमुख यांचे गृहखाते दिलीप वळसे पाटील (पश्चिम महाराष्ट्र) यांच्याकडे गेले. त्यांच्याकडे आधी असलेले उत्पादन शुल्क खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना, तर कामगार मंत्रिपद हे हसन मुश्रीफ (दोघेही पश्चिम महाराष्ट्र) यांना देण्यात आले.

ठाकरे सरकार : विभागीय मंत्रिपदे (विदर्भ वगळता)
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॅबिनेट मंत्री सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, अनिल परब, अस्लम शेख, वर्षा गायकवाड, नवाब मलिक. (७ कॅबिनेट)
मुंबई वगळता कोकण : कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड, उदय सामंत, राज्यमंत्री - अदिती तटकरे. (३ कॅबिनेट, एक राज्यमंत्री)
पश्चिम महाराष्ट्र : कॅबिनेट : उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील. राज्यमंत्री - सतेज पाटील, शंभुराज देसाई, विश्वजित कदम, दत्ता भारणे, राजेंद्र पाटील यड्रावकर. (५ कॅबिनेट, ५ राज्यमंत्री)
उत्तर महाराष्ट्र : छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, के. सी. पाडवी, दादा भुसे, गुलाबराव पाटील, शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (६ कॅबिनेट, एक राज्यमंत्री)
मराठवाडा - कॅबिनेट मंत्री : अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, राजेश टोपे, अमित देशमुख, सांदिपान भुमरे, राज्यमंत्री - अब्दुल सत्तार, संजय बनसोडे. (५ कॅबिनेट, २ राज्यमंत्री)

६२ आमदार असलेल्या विदर्भाने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बऱ्यापैकी धक्का दिला होता आणि काँग्रेसने उल्लेखनीय यश मिळविले होते, हे विशेष.

विदर्भातील सध्याचे मंत्री
डॉ. नितीन राऊत : ऊर्जा
डॉ. राजेंद्र शिंगणे : अन्न व औषधी प्रशासन
विजय वडेट्टीवार : मदत व पुनर्वसन, ओबीसी कल्याण
अ‍ॅड. यशोमती ठाकूर : महिला व बालकल्याण
सुनील केदार : पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण
बच्चू कडू : शालेय शिक्षण, महिला बालकल्याण, कामगार, अल्पसंख्याक विकास.

फडणवीसांच्या कार्यकाळात विदर्भाचे मोठे प्रतिनिधित्व
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, राजकुमार बडोले, डॉ. रणजित पाटील, प्रवीण पोटे, मदन येरावार, संजय राठोड, प्रा. अशोक उईके, डॉ. अनिल बोंडे, डॉ. संजय कुटे, परिणय फुके, भाऊसाहेब फुंडकर हे १२ मंत्री होते.

Web Title: The backlog of ministerial posts in Vidarbha has increased having leaving only five ministerial posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.