न्यायाधीशांची पाठदुखी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नव्हे!
By admin | Published: October 22, 2016 04:31 AM2016-10-22T04:31:25+5:302016-10-22T04:31:25+5:30
उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पाठदुखीचा त्रास मुंबईतील खड्ड्यांमुळे नव्हे, तर त्यांच्या जुन्या वाहनांमुळे होत असेल, असा अजब युक्तिवाद मुंबई महापालिकेने शुक्रवारी केला.
मुंबई : उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पाठदुखीचा त्रास मुंबईतील खड्ड्यांमुळे नव्हे, तर त्यांच्या जुन्या वाहनांमुळे होत असेल, असा अजब युक्तिवाद मुंबई महापालिकेने शुक्रवारी केला.
मुंबईत गाडीतून प्रवास करताना खड्ड्यांमुळे पाठदुखीचा त्रास होतो, असे उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश व्ही. एम. कानडे यांनी एका सुनावणीत म्हटले होते. शुक्रवारी उच्च न्यायालयात मुंबईतील खड्ड्यांप्रकरणी झालेल्या सुनावणीत हाच धागा पकडत महापालिकेच्यावतीने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी युक्तिवाद करताना, न्यायाधीशांच्या गाड्यांचे सस्पेन्शन खराब आहे. त्यामुळे त्यांना जास्त धक्के बसतात आणि त्यानेच त्यांना पाठदुखीचा त्रास होतो. सरकारने त्यांना नव्या गाड्या घेऊन द्याव्यात, असासल्ला दिला. मुंबईतील खड्ड्यांची दखल घेत उच्च न्यायालयाने ‘स्यु-मोटो’ याचिका दाखल करून घेतली आहे. न्या. शंतनू केमकर व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवरील सुनावणी होती. या याचिकेतील एका मध्यस्थीने यावर लवकर सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती खंडपीठाला केली. खड्डे बुजवल्याचा दावा पालिका करत असली तरी स्थिती फारशी बदलेली नसल्याचे असे सांगितले. (प्रतिनिधी)
खड्डे बुजवणे सुरू...
यंदा पाऊस ९९ दिवस पडल्याने, अशी स्थिती उद्भवली आहे. आता पाऊस गेला आहे. खड्डे बुजवण्यासाठी आमचे अभियंते रात्रंदिवस काम करत आहेत, असे अॅड. साखरे यांनी म्हटले. उच्च न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी २४ आॅक्टोबर रोजी ठेवत मध्यस्थीच्या वकिलाला सर्व तपशीलवार माहिती सादर करण्याचे निर्देश दिले.