गडकरी साहेब ‘या’ अधिकाऱ्यांना घरी पाठवा; पुणे-सातारा रस्त्याची दुरावस्था तरी ‘टोल’धाड कायम
By प्रविण मरगळे | Published: October 28, 2020 12:24 PM2020-10-28T12:24:07+5:302020-10-28T12:25:28+5:30
आता पुणे-सातारा रोडच्या दुरावस्थेबाबत प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. याबाबत पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना ईमेलद्वारे पत्र पाठवलं आहे
प्रविण मरगळे
मुंबई – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नव्या इमारतीचं उद्धाटन करण्यात आलं. परंतु या इमारतीच्या बांधकामाला तब्बल ९ वर्ष विलंब झाल्याने गडकरी अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. २०११ मध्ये या इमारतीच्या बांधकामाची निविदा निघाली मात्र दोनशे अडीचशे कोटींचे काम नऊ वर्षांनी पूर्ण झाल्यानं गडकरींनी त्यांच्या शैलीत अधिकाऱ्यांना फटकारलं.
नितीन गडकरींच्या याच मुद्द्यावरुन आता पुणे-सातारा रोडच्या दुरावस्थेबाबत प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. याबाबत पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना ईमेलद्वारे पत्र पाठवलं आहे. या पत्रात म्हटलंय की, NHAI च्या दिल्लीतील इमारतबांधणीस ९ वर्षे लागल्याबद्दल संताप व्यक्त करुन यासाठी जबाबदार अधिकार्यांना घरी पाठवण्याच्या आपल्या मनोदयाचे स्वागतच, अशीच कारवाई पुणे सातारा रस्त्याचे काम १० वर्षे रखडल्याबद्ल महाराष्ट्रातील NHAI च्या अधिकाऱ्यांवरही करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
पुणे सातारा राष्ट्रीय महामार्ग चार पदरी होता, त्याच्या सहापदरीकरणाचे काम १ ऑक्टोबर २०१० रोजी सुरू झाले ज्याला आज १० वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. मूळ कंत्राटाप्रमाणे हे काम ३१ मार्च २०१३ पर्यंत संपणे अपेक्षित होते, मात्र काम अद्याप सुरूच आहे. NHAI ने या कामाला सातत्याने मुदतवाढ देण्याशिवाय काहीही केलेले नाही, या अपूर्ण कामामुळे गेल्या १० वर्षात या रस्त्यावर शेकडो अपघात झाले, डझनावारी निष्पाप नागरिकांचा बळी गेला, वाहतूक कोंडी मुळे हजारो कोटी रुपयांचे बहुमुल्य इंधन वाया गेले आणि लक्षावधी नागरिकांचे कोट्यावधी कामाचे तास वाया गेले, मात्र याची खेदखंत ना कंत्राटदाराला ना NHAI ला अशा शब्दात वेलणकर यांनी नाराजी 'लोकमत ऑनलाइन'शी बोलताना व्यक्त केली आहे.
तसेच निर्लज्ज पणाची कमाल अशी की NHAI दरवर्षी इमानेइतबारे कंत्राटदाराला टोलचे दर मात्र वाढवून देत आहे. गडकरी साहेब आपणसुद्धा गेल्या सहा वर्षात या कामातील दिरंगाईबद्दल तीन वेळा असंतोष प्रकट केला आहे. NHAI च्या दिल्लीतील इमारतबांधणीस ९ वर्षे लागल्याबद्दल संताप व्यक्त करुन दिरंगाईस जबाबदार अधिकाऱ्यांना घरी पाठवण्याचा मनोदय जाहीर केला आहे. हाच न्याय लावून अशीच कारवाई पुणे सातारा रस्त्याचे काम १० वर्षे रखडल्याबद्ल महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवरही करून त्यांना घरी पाठवावे अशी मागणी पत्रात केली आहे.