दूध उत्पादकांसाठी ‘बुरे दिन’
By Admin | Published: April 4, 2015 04:27 AM2015-04-04T04:27:49+5:302015-04-04T04:27:49+5:30
युरोपियन मिल्क असोसिएशन’ने दूध उत्पादन व प्रक्रियेवरील निर्बंध उठविल्यामुळे त्याचा भारतातील दूध उद्योगावर प्रतिकूल परिणाम होण्याची चाहूल
बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा
‘युरोपियन मिल्क असोसिएशन’ने दूध उत्पादन व प्रक्रियेवरील निर्बंध उठविल्यामुळे त्याचा भारतातील दूध उद्योगावर प्रतिकूल परिणाम होण्याची चाहूल लागताच राज्यातील दूध प्रक्रिया व्यावसायिकांंनी दुधाच्या दरात लीटरमागे एक रुपयाने कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांवर ‘बुरे दिन’ येणार आहेत.
दूध व्यवसायातील अग्रेसर स्वीत्झर्लंड, नायजेरिया, डेन्मार्क, आॅस्ट्रेलिया या देशांनी उत्पादन व प्रक्रियेवर निर्बंध ठेवण्यासाठी ‘युरोपियन मिल्क असोसिएशन’ स्थापन केली. मात्र आता या संघटनेने निर्बंध उठविण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा जागतिक दूध प्रक्रिया व्यवसायावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत.
राज्यात दररोज २ कोटी १० लाख लिटर दुधाचे संकलन होते. त्यातील ८० लाख लिटर पॅकिंग व मिठाईच्या दुकानांसाठी लागते व सुमारे १ कोटी २० लाख लीटर दुधापासून पावडर तयार करून ती निर्यातही केली जाते. राज्यात २५ दूध पावडर प्रक्रिया प्रकल्प आहेत. ते युरोपच्या निर्णयाने धास्तावले आहेत.
गुजरातमधील अमूल डेअरी महाराष्ट्रातून १४ लाख लीटर दूध खरेदी करून सुमारे १८ लाख लीटर दूध महाराष्ट्रात विकत होती. आता अमूल महाराष्ट्राचे अवघे एक लाख लीटर दूध खरेदी करते. दूध व्यवसायाला चालना देण्यासाठी गोवा राज्य ७ रूपये, कर्नाटक ४, आंध्रप्रदेश ४, राजस्थान २, हरियाणा २ रुपये प्रति लीटर दुधासाठी अनुदान देते. मात्र राज्य सरकारने दूध व्यवसायाला दिलेला मदतीचा हात केव्हाच काढून घेतला आहे. त्यामुळे हा व्यवसाय आधीच अडचणीत आहे.