निकृष्ट ज्वारी गरिबांच्या माथी!
By admin | Published: February 11, 2017 02:43 AM2017-02-11T02:43:08+5:302017-02-11T02:43:08+5:30
वर्षभरापासून पडून असलेल्या ज्वारीचे वाटप.
संतोष येलकर
अकोला, दि. १0- शासकीय धान्य गोदामांमध्ये गत वर्षभरापासून पडून असलेल्या ज्वारीला भोंगे लागल्याने, पीठ झालेल्या आणि टोकरलेल्या ज्वारीचे जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना वाटप सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पुरवठा विभागामार्फत टोकरलेली ज्वारी जिल्ह्यातील गरीब शिधापत्रिकाधारकांच्या माथी मारल्या जात असल्याची बाब समोर आली आहे.
गतवर्षीच्या खरीप हंगामात शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्हय़ातील सातही तालुक्यांत हमी दराने ज्वारी खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली होती. त्यापैकी अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर व बाश्रीटाकळी या पाच खरेदी केंद्रांवर १ हजार ५७0 रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात आलेली ५८ हजार ६२८ क्विंटल ज्वारी गत डिसेंबर २0१५ मध्ये जिल्हय़ातील शासकीय धान्य गोदामांमध्ये साठविण्यात आली. वर्षभराचा कालावधी उलटून गेला; मात्र शासकीय धान्य गोदामांमध्ये पडून असलेली ज्वारी सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत गरीब शिधापत्रिकाधारकांना वितरित करण्याचा आदेश शासनामार्फत पुरवठा विभागाला प्राप्त झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामांमध्ये पडून असलेल्या हजारो क्विंटल ज्वारीच्या पोत्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात सोंड्यांचा प्रादुर्भाव झाल्याने, पोत्यांमधील ज्वारीचे दाणे टोकरले असून, हजारो क्विंटल ज्वारीचे पीठ झाले आहे. वर्षभरापूर्वी शासकीय धान्य गोदामांमध्ये साठविण्यात आलेली ज्वारी सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना वितरित करण्याचा आदेश गत १ डिसेंबर रोजी शासनामार्फत देण्यात आला. भारतीय खाद्य निगममार्फत (एफसीआय) जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामातील ज्वारीची तपासणी करण्यात आल्यानंतर, वर्षभरापासून शासकीय धान्य गोदामांमध्ये पडून असलेल्या ज्वारीचे वितरण जिल्हा पुरवठा विभागामार्फत २ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील रास्तभाव दुकानांना करण्यात येत आहे. १ रुपया प्रतिकिलो दराने रास्तभाव दुकानांमधून जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना पीठ झालेल्या आणि टोकरलेल्या ज्वारीचे वितरण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्राधान्य गटातील आणि अंत्योदय योजनेतील गरीब शिधापत्रिकाधारकांच्या माथी पीठ झालेल्या आणि टोकरलेली ज्वारी मारली जात आहे.
१९ हजार क्विंटल ज्वारी वितरित!
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्हय़ातील प्राधान्य गट आणि अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांना ज्वारी वितरित करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागामार्फत २ फेब्रुवारीपर्यंत जिल्हय़ातील रास्त भाव दुकानांना १९ हजार ४१0 क्विंटल ज्वारीचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांसाठी १५ हजार क्विंटल आणि अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांसाठी ४ हजार ४१0 क्विंटल ज्वारी वितरित करण्यात आली.