तळीरामांसाठी वाईट बातमी! न्यू इयर पार्टीला बिअरसाठी मोजावे लागणार जास्त पैसे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 10:45 AM2017-12-26T10:45:48+5:302017-12-26T10:47:51+5:30
न्यू इयर पार्टीचे बेत आखणा-या तळीरामांसाठी एक वाईट बातमी आहे. राज्य सरकारने बिअरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई - न्यू इयर पार्टीचे बेत आखणा-या तळीरामांसाठी एक वाईट बातमी आहे. राज्य सरकारने बिअरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मद्यपींना 31 डिसेंबरच्या रात्री बिअरसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. 650 एमएलच्या एका बिअरच्या बाटलीवर 35 ते 40 रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव होता. पण सरकारने थेट इतकी वाढ न करता 15 ते 20 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
एका बिअरच्या बाटलीवर 35 ते 40 रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला असता तर क्वार्टर आणि बिअरच्या किंमतीत फरक राहिला नसता. महाराष्ट्रात काही हाय ब्राण्डेड बिअरचे दर आयएमएफएल क्वार्टरपेक्षा जास्त आहेत. संपूर्ण देशात महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पादन शुल्क कर लावला जातो. या बिअर दरवाढीमुळे सरकारी महसूलात 75 कोटींनी वाढ होणार आहे. 150 कोटींच्या महसूलाचे लक्ष्य होते.
महाराष्ट्रात वार्षिक 33 कोटी लिटर बिअरची विक्री होते. मागच्या वर्षी उत्पादन शुल्क विभागाने 12,288 कोटींचा महसूल मिळवला. यावर्षी 14 हजार कोटींचे लक्ष्य आहे. वाईन उद्योगाला चालना देण्यासाठी उत्पादन शुल्क कर आकारला जात नाही. उत्तर महाराष्ट्रात नाशिकमध्ये देशात वाईन उद्योगाचे मुख्य केंद्र आहे. वाईनमध्ये करात जे नुकसान होते ते बिअरमधून भरुन काढले जाते अशी माहिती सूत्रांनी दिली. वाईन उद्योगात महाराष्ट्राचा वाटा 80 टक्के असून त्याखालोखाल कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पंजाब आणि अन्य राज्यांचा क्रमांक येतो.