खराब रस्त्यांमुळे मराठवाड्यात उद्योग - व्यवसायांवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 03:01 AM2020-12-16T03:01:59+5:302020-12-16T03:02:11+5:30

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. औरंगाबाद-जालना या औद्योगिक पट्ट्यातील उद्योग-व्यवसायांवर परिणाम झाला आहे. अनेक जिल्ह्यांत शेतमालाची वाहतूक करणेही जिकिरीचे झाले आहे. खराब रस्त्यांचा नागरिकांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होतो आहे.

Bad roads affect industries and businesses in Marathwada | खराब रस्त्यांमुळे मराठवाड्यात उद्योग - व्यवसायांवर परिणाम

खराब रस्त्यांमुळे मराठवाड्यात उद्योग - व्यवसायांवर परिणाम

googlenewsNext

खड्डेमय रस्त्यामुळे प्रवासाचा वेळ दुप्पट
लातूर ते नांदेड, उदगीर, औसा, बार्शी मार्गाची वर्षानुवर्षे केवळ डागडुजी केली जात असल्याने खड्ड्यांचा प्रश्न जैसे थे आहे. लातूर ते नांदेड १३५, लातूर ते बार्शी १००, लातूर ते औसा २०, लातूर ते उदगीर ७० किलोमीटरचे अंतर आहे. हे अंतर पार करण्यासाठी दुप्पट वेळ लागतो. लातूरहून नांदेडला जाण्यासाठी सध्या ५ तासांहून अधिक वेळ लागतो. या मार्गावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारक पुरते वैतागले आहेत.

रस्त्याची तक्रार पोलिसांत! 
औरंगाबादहून फुलंब्रीकडे जाणारा रस्ता माझी मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळवणूक करतो, अशी तक्रार एका महिलेने नुकतीच पोलिसांत केली. ही तक्रारच औरंगाबाद जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था मांडायला पुरेशी आहे. फुलंब्रीकडे जाणाऱ्या रस्त्यासारखीच अवस्था कमी अधिक प्रमाणात जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांची आहे. जिल्ह्यात ११९९ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. 

नांदेड-लातूर प्रवास म्हणजे मरण यातना
नांदेड जिल्ह्यात मागील अकरा महिन्यात रस्ते अपघातात सुमारे अडीचशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला. नांदेड-लातूर रस्ता तर मृत्युचा सापळा झाला आहे. बुट्टी बोरी ते तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले आहे. तीच परिस्थिती राष्ट्रीय महामार्ग २२२ अर्थात कल्याण ते म्हैसा या रस्त्याची आहे. मागील दोन वर्षापासून रस्ते कामासाठी ठिकठिकाणी हा मार्ग खोदून ठेवण्यात आला आहे. सिडको ते शिराढोण- हळदा-राऊळ-दिग्रस-जांब या रस्त्याचीही स्थिती दयनीय आहे. 

...हा रस्ता नव्हे तर  ‘महाबळीमार्ग’ 
जिल्ह्यातून गेलेल्या सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाचे काम ७ वर्षे झाली तरी सुरूच आहे. वर्षभरात या मार्गावर ६६ जणांचा अपघाती बळी गेला आहे. या महामार्गावर जिल्ह्यात १२ उड्डाणपूल आहेत. ते सर्व अर्धवट अवस्थेत आहेत. येळी, शिवाजीनगर तांडा, दाळिंब, येणेगूर, मुरुम मोड, नळदुर्ग येथील रस्त्यांवर प्रचंड खड्डे आहेत. असे असतानाही दोन ठिकाणी टोल सुरू केला आहे़. 
रस्त्यामुळे वाढल्या चोऱ्या
 खामगाव-पंढरपूर या रस्त्याचे कन्हेरवाडी येथील काम दोन वर्षांपासून रखडले आहे. तर कळंब लगतचे ४ किमीचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे तिथे वाहनांची गती कमी होते. 
 ही संधी साधून चोरटे चालत्या वाहनात मागून प्रवेश करुन आतील मालाची चोरी करीत आहेत. कन्हेरवाडी, येरमाळानजीक अशा घटना घडल्या आहेत. 

मापदंड डावलून रस्त्यांची कामे
मागील पाच वर्षांमध्ये जिल्ह्यातील रस्त्यांची सुधारणा झाल्याने दळणवळण सुलभ झाले असले तरी गतिमान वाहतुकीमुळे अपघातांची नोंद दिवसेंदिवस शासन दरबारी होत आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम शासनाच्या मापदंडानुसार होत नसल्याचे दिसून आले आहे. बीडलगत तेलगाव रोड, कुर्ला रोडवर बायपास होऊनही सर्व्हिस रोड अद्याप झालेले नसल्याने परिसरातील नागरिकांपुढे अडचणी कायम आहेत. 

देखभालीअभावी दुरवस्था  
सहा वर्षात जवळपास चार हजार कोटी रुपये मिळाल्याने जिल्ह्यातील रस्त्यांचे भाग्य उजळले. मात्र तरीही जालना ते औरंगाबाद आणि जालना ते मंठा या रस्त्याची अवस्था बिकट आहे. बीओटी तत्त्वावर हे रस्ते बांधण्यात आले आहेत; परंतु कंत्राटदार देखभालीकडे दुर्लक्ष करीत असल्याने ही दुरवस्था झाली आहे.  

अतिवृष्टीने ५०० कि.मी.च्या रस्त्यांची दुरवस्था 
यंदा अतिवृष्टीसह विविध कारणांनी रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून सा.बां.विभागाचे अडीचशे किलोमीटर तर जि.प.चेही तेवढ्याच लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गाची कामेही मंद गतीने सुरू असल्याने जवळपास दीडशे ते दोनशे कि.मी.चे अंतरही प्रवाशांसाठी जीवघेणे ठरत आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्त्यासह पुलांच्या कामासाठी शासनाने २ हजार ६३५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यातील ५५० कोटी मराठवाड्यातील रस्ते  दुरुस्तीसाठी मिळणार आहेत. पुढील दोन महिन्यांत कामे मार्गी लागतील.
- अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री

३३० कोटी खर्चूनही दुरवस्था कायम
२०१५-१६ ते २०१८-१९ या कालावधीत  रस्ते दुरुस्तीवर तब्बल ३३० कोटी ४८ लाखांचा खर्च करूनही  रस्त्यांची स्थिती दयनीय आहे. परभणी- गंगाखेड, परभणी- जिंतूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला एप्रिल २०१७ मध्ये मंजुरी मिळाली. अद्यापही कामे पूर्ण झालेली नाहीत. मानवत रोड ते झिरोफाटा या रस्त्याचे काम गेल्या ४ वर्षांपासून ठप्प आहे. 
सोशल मीडियावर टीका
 सेलू-पाथरी या २२ कि.मी. रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे. या रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्याने नागरिक त्रस्त आहेत.   
 त्रस्त नागरिकांनी अखेर सोशल मीडियावर मीम्सचा आधार घेत या रस्त्याच्या अवस्थेकडे लक्ष वेधले. 
 या मीम्स खूप व्हायरल झाल्या. त्याची दखल घेत अखेरीस संबंधित कंत्राटदाराकडून चार दिवसांपूर्वी रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. 

Web Title: Bad roads affect industries and businesses in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.