अवकाळीचा इशारा कायम; राज्यभरात ठिकठिकाणी चार दिवस पावसाचे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 06:57 AM2023-05-04T06:57:29+5:302023-05-04T06:58:14+5:30
मुंबई शहराला पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी प्रत्यक्षात मात्र कडाक्याच्या उन्हाने नागरिकांची अक्षरश: होरपळ झाली
मुंबई - मुंबईसह राज्यभरातील जिल्ह्यांना उन्हाचा तडाखा बसत असतानाच दुसरीकडे अवकाळी पावसानेही कहर केला आहे. राज्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची बरसात होत असतानाच आता पुन्हा एकदा चार दिवसांसाठी राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी संपूर्ण राज्यात अवकाळीची शक्यता आहे. शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील जिल्ह्यांना इशारा देण्यात आला आहे. शनिवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. रविवारी विदर्भातील जिल्ह्यांत अवकाळी पाऊस कोसळू शकतो.
मुंबई शहराला पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी प्रत्यक्षात मात्र कडाक्याच्या उन्हाने नागरिकांची अक्षरश: होरपळ झाली असून, ३२ ते ३५ अंशावर असणारा पारा मुंबईकरांचा घाम काढत आहे. विशेषत: मंगळवारसह बुधवारी मुंबईत तापमान ३५ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत असले तरी आर्द्रता तापदायक ठरत आहे. विशेषत: आकाश मोकळे असल्याने सकाळी ११:०० पासून दुपारी ४:०० वाजेपर्यंत पडणारे ऊन मुंबईकरांच्या त्रासात भरच घालत असून, यात उत्तरोत्तर आणखी भरच पडणार आहे.
कुठे आहे किती पारा?
मुंबई ३२.७
अहमदनगर ३४.९
नाशिक ३३.६
जालना ३५.४
परभणी ३३.३
सातारा ३५.२
कोल्हापूर ३४.१
सोलापूर ३६.६
पुणे ३३.९
सांगली ३४.८
बीड ३६.२
जळगाव ३५