मविआतील पक्षांना अक्षय शिंदेचा पुळका आलाय; भाजपाचा घणाघात, उद्धव ठाकरेंवरही टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 10:41 AM2024-09-25T10:41:53+5:302024-09-25T10:43:25+5:30
अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. त्यात एन्काउंटरमधील पोलिसांचे निलंबन करावे अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
मुंबई - बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटरनंतर त्यावरून महाविकास आघाडीकडून सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधला जात आहे. त्यावरून आता भाजपाने पलटवार करत मविआला टोला लगावला. "मविआ का हाथ सिर्फ और सिर्फ गुनहागरों के साथ" हेच पुन्हा पुन्हा सिद्ध होतंय. उद्धव ठाकरे मतांच्या राजकारणात अडकलेत अशा शब्दात भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे.
केशव उपाध्ये यांनी ट्विट करत म्हटलंय की, बदलापूरमध्ये घडलेल्या संतापजनक प्रकाराने संपूर्ण महाराष्ट्र खवळला होता. त्या गुन्हेगाराला तेवढीच मोठी शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू होते. आणि त्याला ती शिक्षा मिळाली सुद्धा… परंतु, इकडे या घटनेचा देखील मविआने राजकारणासाठी वापर करायला सुरुवात केली. आज लगेच विरोधी पक्षाने गळे काढायला सुरुवात केली. कालपर्यंत ज्या अक्षय शिंदेला फाशी व्हावी, गुन्ह्याला शिक्षा व्हावी म्हणून मविआतील सर्व नेते गळे काढत होते त्याच मविआतील पक्षांना आज अगदी त्याच शिंदेचा पुळका आला आहे असा आरोप त्यांनी केला.
मविआ का हाथ, गुनहागरों के साथ...
— Keshav Upadhye (@keshavupadhye) September 25, 2024
बदलापूरमध्ये घडलेल्या संतापजनक प्रकाराने संपूर्ण महाराष्ट्र खवळला होता. त्या गुन्हेगाराला तेवढीच मोठी शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू होते. आणि त्याला ती शिक्षा मिळाली सुद्धा…
परंतु, इकडे या घटनेचा देखील मविआने राजकारणासाठी वापर करायला…
तसेच हे काही नवीन नाहीये. ज्या ज्या वेळी गुन्हेगारांना शिक्षा झाली आहे काँग्रेसला पोटशूळ उठला आहे. दिल्लीतील बाटला हाऊस चकमक आठवत असेल तर त्या चकमकीनंतर, तिथले फोटो बघून मॅडम ढसाढसा रडल्या होत्या, त्यांना रात्रभर झोप आली नव्हती. महाराष्ट्रात इशरत जहाँच्या केसमध्ये सुद्धा काँग्रेसला फार वाईट वाटलं होतं. शरदपवार गटाच्या नेत्यांनी तिच्या घरी जाऊन मदत दिली होती. आता बदलापूरच्यावेळी तेच दिसतय असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, यात दुर्दैव हेच की आता त्यांच्या जोडीला उबाठा सुध्दा जाऊन बसले आहे. बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी पोलिसांच कौतुक केल असत पण मतांच्या राजकारणात अडकलेले उद्धव ठाकरे आता सरकारवर टीका करत आहेत. मविआ का हाथ सिर्फ और सिर्फ गुनहागरों के साथ हेच पुन्हा पुन्हा सिद्ध होतंय हे म्हणूनच म्हणावं वाटत असा टोलाही भाजपाच्या केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंना लगावला आहे.