बदलापूर अत्याचार प्रकरण: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर SIT ची स्थापना...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 03:19 PM2024-08-20T15:19:56+5:302024-08-20T15:20:20+5:30

वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT ची स्थापना.

Badlapur Atrocities Case: Home Minister Devendra Fadnavis orders formation of SIT | बदलापूर अत्याचार प्रकरण: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर SIT ची स्थापना...

बदलापूर अत्याचार प्रकरण: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर SIT ची स्थापना...

Devendra Fadnavis on Badlapur Case :बदलापूर शहरातील एका प्रसिद्ध शाळेत चार वर्षीय दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर पीडित मुलींच्या पालकांसह नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून, आरोपीला कठोर शिक्षेची मागणी होत आहे. यासाठी आज संतप्त नागरिकांनी बदलापूर स्थानकावर रेल्वे गाड्या रोखत आंदोलन केले. नागरिकांच्या उद्रेकानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी SIT स्थापनेचे आदेश दिले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने ट्विट केले की, बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी दिले कारवाईचे निर्देश
या प्रकरणाची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली आणि अशा घटना होऊ नयेत म्हणून कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्यास सांगितलं. ज्या विद्यार्थी किंवा पालकांना अडचणी येत असतील त्यांच्यासाठी प्रत्येक शाळेत एक तक्रार पेटी लावावी अशी सूचना त्यांनी केली. शिवाय, मुख्यमंत्री शिंदेंनी आरोपीला कडक शासन करण्यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालवण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केली. सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.     

‘लाडक्या बहिणीं’च्या छोट्या मुलीही असुरक्षित
या घटनेवरुन उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. एका बाजूला आपण लाडकी बहीण म्हणत असताना योजना आपल्या राज्यात लाडक्या बहिणी आणि या बहिणींच्या लहान मुली असुरक्षित आहेत. त्यांच्यावरती अत्याचार होत आहेत. आपण कुठल्यातरी एखादा विषय घेऊन हे एखाद्या राज्यात झालेली घटना नाही. देशात कुठली अशी घटना घडतात कामा नये आणि या घटनेला जे कोणी गुन्हेगार जबाबदार असतील त्यांना तर लवकरात लवकर खटला चालवावा, अशी मागणी त्यांनी केली. 

गृहखातं मूग गिळून का गप्प बसलंय? जयंत पाटील
बदलापुरात लहान मुलींवर जो प्रसंग ओढावला, तो अतिशय संतापजनक आहे. मी त्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. सध्या राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. महिलांवरील अत्याचारासाठी आपण दिल्ली नोएडासारख्या भागांना नावे ठेवायचो, आता महाराष्ट्राची परिस्थितीही तशीच होत चालली आहे. सरकार लाडक्या बहिणींच्या लेकींच्या सुरक्षेसाठी काय करत आहे? राज्यातील गृहखाते मूग गिळून का गप्प बसले आहे? योजना आणली, पैसे वाटले म्हणजे तुमचे बाकीचे कर्तव्य संपले? मुख्यमंत्री राहतात त्याच जिल्ह्यात मुली सुरक्षित नसतील तर राज्यातील इतर भागात तरी कशा सुरक्षित राहतील? हा खरा प्रश्न आहे, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला आहे 

बदलापूरच्या शाळेत काय घडले?
बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेतील चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर नराधमाने अत्याचार केले. या प्रकरणात एका मुलीवर अत्याचार करण्यात आले आहेत, तर दुसऱ्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला आहे. या मुली प्रसाधनगृहात जात असताना शाळेतील एका कर्मचाऱ्याने संतापजनक प्रकार मुलींसोबत केला. दोन्ही मुलींनी पालकांना याबाबत माहिती दिल्यानंतर पालकांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 
 

Web Title: Badlapur Atrocities Case: Home Minister Devendra Fadnavis orders formation of SIT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.