बदलापूर इफेक्ट : सरकार ॲक्शन मोडवर; दिवसभरात अनेक निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 05:42 AM2024-08-22T05:42:00+5:302024-08-22T06:31:25+5:30

नियुक्तीआधी शाळा कर्मचाऱ्यांची आता हाेणार चारित्र्य पडताळणी, शालेय शिक्षण विभागाने काढला जीआर; महिनाभरात सीसीटीव्ही बसविणे बंधनकारक

Badlapur Effect: Government on Action Mode; Many decisions during the day | बदलापूर इफेक्ट : सरकार ॲक्शन मोडवर; दिवसभरात अनेक निर्णय

बदलापूर इफेक्ट : सरकार ॲक्शन मोडवर; दिवसभरात अनेक निर्णय

मुंबई : बदलापूरच्या शाळेतील घटनेनंतर आता राज्य सरकार ॲक्शन मोडवर आले आहे. शाळांमधील मुलामुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करणारा आदेश शालेय शिक्षण विभागाने बुधवारी काढला. त्यानुसार कोणत्याही शाळेत कर्मचारी नेमताना आधी त्यांची चारित्र्य पडताळणी पोलिस विभागाकडून करणे अनिवार्य असेल. प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही असणे बंधनकारक राहील.

सीसीटीव्हीत आक्षेपार्ह वर्तन आढळल्यास संबंधितावर तत्काळ कारवाई करण्याची जबाबदारी शाळेचे व्यवस्थापन व मुख्याध्यापकांवर असेल. कंत्राटी कर्मचारी नेमताना त्याची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक असेल. पुढील महिनाभरात शाळेच्या मोक्याच्या परिसरात योग्य प्रमाणात सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बाबत हलगर्जीपणा केला तर कारवाई केली जाईल. हे सीसीटीव्ही चालू आहेत की नाही याची तपासणी, कंट्रोल रुम, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, फुटेजमध्ये आक्षेपार्ह बाब आढळल्यास कार्यवाहीची जबाबदारी मुख्याध्यापकांवर असेल.

शक्ती कायदा लवकरच
महिलांच्या सुरक्षेसंबंधीचा शक्ती कायदा लवकरात लवकर आणणे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. बदलापूरच्या घटनेत, आरोपीला पकडले आहे. कारवाई सुरू आहे. मात्र शाळा व्यवस्थित सुरू झाली पाहिजे त्यासाठी आजूबाजूला शांतता हवी, असे केसरकर यांनी सांगितले.

२६ ऑगस्टपर्यंत अक्षय शिंदेला पोलिस कोठडी
कल्याण (जि. ठाणे) : बदलापूर येथील शाळेतील दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचे वकीलपत्र घेण्यास कल्याण जिल्हा सत्र न्यायालयातील वकील संघटनांनी स्पष्ट नकार दिला. हा एक अत्यंत निंदनीय आणि घृणास्पद प्रकार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जगताप यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आरोपी अक्षय शिंदे याला बुधवारी जिल्हा सत्र न्यायालयाने २६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

‘त्या’ शाळेचा ताबा प्रशासकाकडे
शिक्षणमंत्री दीपक केसरकर पत्रकार परिषदेत म्हणाले, बदलापुरातील शाळेत झालेला प्रकार हा घृणास्पद होता. यातील दिरंगाई अक्षम्य होती. शिक्षण उपसंचालकाला चौकशीचे आदेश दिले होते. तो अहवाल आमच्याकडे आला असून संचालकांनी या शाळेवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. उद्यापासून या शाळेचा ताबा प्रशासक घेतील.

अक्षयची झाली तीन लग्ने
अक्षयचे वय २४ वर्षे असले तरी त्याची तीन लग्ने झाली होती. मात्र, तिन्ही पत्नी त्याला सोडून गेल्या आहेत. अक्षयचे शिक्षण दहावीपर्यंतच झाले असून, तो बदलापूरमधील एका शाळेत सफाई कामगार म्हणून काम करीत होता. याआधी तो एका इमारतीत सुरक्षारक्षक म्हणून होता. त्यानंतर एका कंत्राटाद्वारे त्याला एका खासगी शाळेत सफाई कामगार म्हणून नोकरी मिळाली. अक्षय कर्नाटकातील गुलबर्गा गावातील असून, त्याचा जन्म मात्र बदलापूरमधील खरवई गावात झाला.

आरोपी अक्षयच्या घराची तोडफोड
बदलापूर : येथील शाळेतील गैरकृत्यातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या खरवई येथील घराची ग्रामस्थांनी तोडफोड केली असून, त्याच्या कुटुंबीयांना घराबाहेर काढण्यात आले आहे. शिंदेच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अक्षय शिंदे येथील खरवई परिसरातील एका चाळीत राहतो. त्याच्या कुटुंबात आई-वडील आणि भाऊ हे तिघे आहेत. मंगळवारी शाळेतील गैरकृत्यात अक्षयचा सहभाग असल्याचे समजताच त्याच्या कुटुंबीयांना खरवईतील ग्रामस्थांनी घराबाहेर काढून घराची तोडफोड करत त्यांना गाव-परिसर सोडण्यास भाग पाडले. 

Web Title: Badlapur Effect: Government on Action Mode; Many decisions during the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.