बडोलेंना महाराष्ट्रातून हाकला - संभाजीराजे
By admin | Published: October 15, 2016 05:35 PM2016-10-15T17:35:35+5:302016-10-15T17:37:32+5:30
सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना महाराष्ट्रातूनच हाकलून देण्यात यावे, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी कोल्हापुरात केली.
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. १५ - न्याय हक्क मिळविण्यासाठी मराठा समाजाचे राज्यभर मूकमोर्चे सुरू आहेत. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाच्या हक्काला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ही मागणी या मोर्चातून करण्यात येत आहेत. परंतु, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी या मोर्चाबाबत केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. त्यामुळे मंत्री बडोले यांना महाराष्ट्रातूनच हाकलून देण्यात यावे, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शनिवारी येथे केली.
(पैसेवाल्यांची आंदोलने यशस्वी होत आहेत, बडोले याचं खळबळजनक वक्तव्य)
खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, आक्रमक अशी मराठा समाजाची ओळख आहे तरीही, राज्यभर लाखोंच्या उपस्थितीत अत्यंत शिस्तबद्धपणे मराठा क्रांती मूकमोर्चे काढण्यात येत आहेत. याद्वारे मराठा समाजाने न्यायहक्कांच्या मागण्यांसाठीही काढण्यात येणाऱ्या संबंधित मोर्चाद्वारे एक आदर्श घालून दिला आहे. त्यातून मराठा समाजाने आपली एकजूट दाखवून दिली आहे. आतापर्यंत कोणतेही राजकीय नेतृत्व नसतानाही सकल मराठा समाज हेच नेतृत्व मानून मोर्चे यशस्वी झाले आहेत. इतर समाजासाठी हे आदर्शवत आहे. असे असताना मंत्री बडोले यांनी मराठा क्रांती मूकमोर्चाबाबत केलेले वक्तव्य साफ चुकीचे आहे. याबद्दल त्यांचा मी निषेध करतो शिवाय त्यांना महाराष्ट्रातून हाकलून द्यावे. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे. अॅट्रॉसिटीच्या कायद्यात सुधारणा व्हावी. इबीसी सवलतीसाठी उत्पन्नाची मर्यादा वाढवून सरकारने बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो.
(प्रतिनिधी)