‘आॅस्ट्रेलियन फोटो कॉन्टेस्ट’मध्ये बैजू पाटील प्रथम

By Admin | Published: April 10, 2016 02:54 AM2016-04-10T02:54:48+5:302016-04-10T02:54:48+5:30

वन्यजीव छायाचित्रकारांच्या प्रतिभेला वाव देण्याच्या हेतूने आॅस्ट्रेलियातील ‘शूट द फ्रेम’ या संस्थेतर्फे दिला जाणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रख्यात वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांना मिळाला.

Baeju Patil first in 'Photo Gallery' | ‘आॅस्ट्रेलियन फोटो कॉन्टेस्ट’मध्ये बैजू पाटील प्रथम

‘आॅस्ट्रेलियन फोटो कॉन्टेस्ट’मध्ये बैजू पाटील प्रथम

googlenewsNext

पुरस्कार : जगभरातील साडेतीन हजार छायाचित्रकारांतून निवड

औरंगाबाद : वन्यजीव छायाचित्रकारांच्या प्रतिभेला वाव देण्याच्या हेतूने आॅस्ट्रेलियातील ‘शूट द फ्रेम’ या संस्थेतर्फे दिला जाणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रख्यात वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांना मिळाला. ‘शूट द वाइल्ड विनर’ या प्रकारात जगभरातून ३५०० फोटोंमधून बैजू यांच्या जायकवाडी धरणावर काढलेल्या ‘रिव्हरटर्न’ या पक्ष्याच्या फोटोला पहिल्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
वन्यजीव छायाचित्रणातील ३५हून अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करून बैजू यांनी देशाचे नाव जगात उंचावले आहे. आॅस्ट्रेलियातील नॉर्थकोट व्हिक्टोरिया येथील संस्था दर महिन्याला जगभरातील वन्यजीव छायाचित्रकारांना स्पर्धेसाठी आमंत्रित करते. या स्पर्धेत बैजू यांच्या फोटोला पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे वर्षाच्या शेवटी पुरस्कारप्राप्त १२ उत्तम छायाचित्रांतून एका सर्वोत्तम फोटोची निवड केली जाणार आहे.
स्पर्धेत आफ्रिकेतील वन्यजीव छायाचित्रकार अधिक प्रमाणात भाग घेतात. कारण वन्यजीव छायाचित्रणासाठी तेथे पूरक वातावरण आहे. त्या तुलनेत भारतात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आपल्याकडे जलप्रदूषण, धूळ, वातावरणातील बदल यामुळे पक्षी, प्राण्यांना सतत त्रास होत असतो, तसेच येथील काही प्राणी सहजगत्या दृष्टीस न पडणारे असल्याने वन्यजीव छायाचित्रकारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करील असा फोटो काढणे अतिशय अवघड असते; परंतु या सर्वांवर मात करीत बैजू यांनी रिव्हरटर्न या पक्ष्याचा पुरस्कार प्राप्त फोटो टिपला आहे. बैजू यांना याआधी बँकेकडून दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार तसेच सॅन्युरी एशियाकडून दिला जाणारा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय त्यांना पिकासो, वर्ल्ड वाईल्ड लाईफ फेडरेशन, नॅशनल वाईल्ड लाईफ फेडरेशनच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

दहा दिवस दररोज चार तास परिश्रम : पुरस्कार प्राप्त फोटोबद्दल सांगताना बैजू म्हणाले की, मला या फोटोसाठी सतत १० दिवस जायकवाडी धरणावर जावे लागले. पहाटे ४ वाजता पैठणच्या दिशेने मी निघायचो आणि ५ ते ८ वाजेपर्यंत उत्तम फ्रेम मिळविण्यासाठी प्रतीक्षा करायचो. प्रत्यक्षात किंगफिशर या पक्ष्याचे फोटो घ्यायचे होते; परंतु अचानक एके दिवशी दिवस उजाडण्याच्या वेळी पाण्यात काही हालचाल नव्हती आणि पाण्याच्या पृष्ठभागावर आलेला मासा पकडण्यासाठी रिव्हरटर्न पाण्याच्या दिशेने खाली आला. त्याचवेळी कॅमेरा तिकडे फिरवला; पण हवी तशी फ्रेम मिळाली नाही. तो पक्षी त्याच भागात घिरट्या घालत असल्याचे पाहून तो पुन्हा खाली येणार अशी खात्री झाली. काही वेळ वाट पाहिल्यानंतर त्याने चोचीत मासा पकडण्यासाठी पुन्हा पाण्याकडे झेप घेतली आणि अप्रतिम असा फोटो मिळाला. यात दोन पक्षी असल्याचा भास होतो; पण प्रत्यक्षात मात्र तो एकच पक्षी आहे. याच्यापेक्षा चांगला फोटो घेण्यासाठी आणखी काही दिवस धरणावर गेलो; मात्र त्यापेक्षा चांगला क्षण टिपता आला नसल्याचे बैजू यांनी सांगितले.

विजय दर्डा यांचे प्रोत्साहन
लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन विजय दर्डा यांचे फोटोग्राफीसाठी कायमच प्रोत्साहन मिळाले आहे. त्यांच्यामुळेच मी अंदमान बेटावर यासंदर्भात विशेष प्रशिक्षण घेतल्याची माहिती बैजू यांनी ‘लोकमत’ला दिली. त्यांच्या ‘वाईल्ड स्केप’ या कॉफीटेबलचे प्रकाशक विजय दर्डा होते. त्याचे प्रकाशन मुंबईत राजभवनात तत्कालीन राज्यपाल
डॉ. के. शंकरनारायण आणि
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या हस्ते झाले होते.

Web Title: Baeju Patil first in 'Photo Gallery'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.