बॅगचोराला महिलेने शिकवला धडा
By admin | Published: April 2, 2016 01:38 AM2016-04-02T01:38:26+5:302016-04-02T01:38:26+5:30
चालत्या रिक्षातून एका महिलेची पर्स हिसकाविण्याचा प्रयत्न गोरेगावच्या आरे परिसरात घडला. मात्र या महिलेने चोराला न घाबरता उलट त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करत चांगलाच
मुंबई : चालत्या रिक्षातून एका महिलेची पर्स हिसकाविण्याचा प्रयत्न गोरेगावच्या आरे परिसरात घडला. मात्र या महिलेने चोराला न घाबरता उलट त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करत चांगलाच धडा शिकविला. या प्रकरणी वनराई पोलिसांनी या चोरावर दरोड्याचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. नीरज गोवेकर (२४) असे अटक केलेल्या चोराचे नाव आहे.
बीपीओमध्ये काम करणाऱ्या आणि कांदिवलीच्या समतानगर परिसरात राहणाऱ्या डिम्पल मेहता शुक्रवारी पहाटे ४च्या सुमारास घराच्या दिशेने रिक्षातून जात होत्या. त्या वेळी आरेच्या गेट क्रमांक ३ येथे एका दुचाकीवरून आलेल्या गोवेकरने अचानक मेहता यांच्या रिक्षाजवळ जाऊन त्यांच्या हातातील पर्स हिसकावण्याचा प्रयत्न केला. जवळपास दोन ते तीन मिनिटे चालत्या रिक्षात हा प्रकार सुरू होता. मेहता यांनी त्यांच्या हातातली पर्स घट्ट धरून ठेवली आणि गोवेकरलाच खेचून दुचाकीवरून खाली पाडले. त्यानंतर रिक्षातून उतरून आरडाओरड केली. त्याचवेळी वनराई पोलिसांचे पथक गस्तीवर होते. मेहता यांचा आवाज ऐकून त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मेहतांनी घडलेला प्रकार त्यांना सांगितल्यानंतर गोवेकरला ताब्यात घेण्यात आले. (प्रतिनिधी)
गोवेकरवर दरोड्याचा गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. गुन्हा घडला तेव्हा तो नशेत होता. त्याला गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, याचा तपास सुरू आहे.
- चंद्रकांत गुरव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वनराई पोलीस ठाणे