आरक्षणावर बागेश्वर बाबांचे मोठे विधान; थेट भाष्य करत म्हणाले, “मराठा समाजाला...”
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 10:39 AM2023-11-07T10:39:49+5:302023-11-07T10:42:42+5:30
Bageshwar Dham Bageshwar Baba Dhirendra Krishna Shastri On Maratha Reservation: राज्यातील मराठा आरक्षणप्रश्नी बागेश्वर बाबा यांनी सविस्तर भाष्य करत ठाम भूमिका मांडली आहे.
Bageshwar Dham Bageshwar Baba Dhirendra Krishna Shastri On Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा चांगलाच तापल्याचे पाहायला मिळत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. यावेळी मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा मुदत दिली असून, आरक्षण मिळायलाच हवे, अशी ठाम भूमिका घेतल्याचे दिसत आहे. मराठा आरक्षणप्रश्नी आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यातच धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री सातत्याने चर्चेत आहेत. बागेश्वर बाबा सध्या देशभरात अनेक ठिकाणी दिव्य दरबार भरवत आहेत. हजारो-लाखो भाविक या दरबारांना उपस्थित राहत आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे का?
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बागेश्वर बाबा म्हणाले की, देश गुलामीत होता. त्या कठीण परिस्थितीत ज्या शूरवीरांनी आपली भारतमाता गुलामीतून मुक्त करण्यासाठी मोठा लढा दिला, त्यात सर्वाधिक योगदान मराठा समाजाचे होते. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी बागेश्वर पीठाची मागणी आहे. सरकारला आवाहन करतो की, त्यांनी चर्चा करून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, अशा शब्दात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मराठा आंदोलनास पाठिंबा दिला.
दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आव्हान तुम्ही स्वीकारत नाही असा आरोप होत आहे, असे विचारले असता धीरेंद्र शास्त्री यांनी सांगितले की, कोणतेही प्रश्न, वादविवाद हे मीडियात बोलून सुटत नाहीत. तुमचे कुठे दुखत असेल तर तुम्हाला डॉक्टरकडे जावे लागते. माझ्याबाबतीत तुम्हाला काही चुकीचे वाटत असले तर तुम्ही मीडियात प्रश्न न मांडता माझ्याकडे या, हेच मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांना सांगत आहे. मी नागपुरात आलो, मुंबईत आलो; पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्याशी संवाद साधला नाही. मी छत्रपती संभाजीनगरात त्यांना आवाहन करतो, येथे तीन दिवस आहे. काही तुम्हाला खटकत असेल तर तुम्ही माझ्याशी चर्चा करायला या, असे बागेश्वर बाबा यांनी सांगितले.