उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरींचे नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 03:35 AM2018-07-21T03:35:45+5:302018-07-21T03:36:08+5:30
जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला अहिराणी भाषेतील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याच्या महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयकाला विधान परिषदेत सर्वपक्षीय सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली.
नागपूर : जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला अहिराणी भाषेतील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याच्या महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयकाला विधान परिषदेत सर्वपक्षीय सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. या विधेयकाला विधानसभेत यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे.
विधेयकाला मंजुरी देण्यापूर्वी सभागृहात बहिणाबाई चौधरी यांच्या अनेक कविता सदस्यांनी वाचून दाखवल्या. राष्ट्रवादीचे जयदेव गायकवाड, विक्रम काळे, ख्वाजा बेग, प्रा. जोगेंद्र कवाडे, प्रा. अनिल सोले, गिरीश व्यास, रामहरी रूपनवर,स्मिता वाघ, विद्या चव्हाण यांच्यासह शरद रणपिसे यांनीही बहिणाबाई यांच्या योगदानावर माहिती दिली. प्रकाश गजभिये यांनी स्वत: केलेली बहिणाबाई यांच्यावरील कविता वाचून दाखवली. तर चंद्रकांत रघुवंशी यांनी अहिराणी भाषेतून विधेयकला पाठिंबा दिला.हरिभाऊ राठोड यांनी गोरमाटी बोलीत आपले भाषण करत विद्यापीठात गोरमाटी बोलीचे संवर्धन व्हावे अशी मागणी केली.
विधेयकाला मंजुरी मिळण्यापूर्वी उच्च शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर सांगितले की, मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्री स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत. नोव्हेंबर २०१३ मध्ये सरकारने केंद्राला प्रस्ताव पाठवला असून त्यात असलेले निकष पूर्ण केले जात आहेत. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडे हा प्रस्ताव विचाराधीन आहे. राज्य सरकारकडून याचा वेळोवेळी पाठपुरावा केला जात असल्याची माहिती वायकर यांनी दिली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याचे विधेयक मंजूर करताना वायकर यांनी ही माहिती दिली.
मराठी भाषेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे न्यावे अशी मागणी काँग्रेसचे शरद रणपिसे यांनी केली होती. त्यावर वायकर यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलून यावर निर्णय घेतला जाईल. अशी ग्वाही दिली.