लातुरात बहुजन क्रांती मोर्चा
By Admin | Published: January 10, 2017 05:25 PM2017-01-10T17:25:10+5:302017-01-10T17:25:10+5:30
लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांचा संयुक्त बहुजन क्रांती मोर्चा मंगळवारी दुपारी १२.५० वाजेच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर
>ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 10 - लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांचा संयुक्त बहुजन क्रांती मोर्चा मंगळवारी दुपारी १२.५० वाजेच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. या मोर्चात लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता. दुपारी ३.३० वाजता बहुजन क्रांती मोर्चाचा समारोप जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर झाला.
लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांतील बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी दुपारी १२.५० वाजण्याच्या सुमारास डॉ. आंबेडकर पार्क येथून या मोर्चाला सुरुवात झाली. अशोक हॉटेल, शिवाजी चौक आणि जुने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात विविध मागण्यांचे फलक हाती घेतलेले कार्यकर्ते, महिला सहभागी झाल्या होत्या. मोर्चात कार्यकर्त्यांकडून हाती फलक घेऊन विविध घोषणा देण्यात आल्या. अॅट्रॉसिटी कायदा कडक करावा, अॅट्रॉसिटीसाठी स्वतंत्र न्यायालय आणि स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात यावी, जे लोक एससी, एसटीमधील लोकांचा गैरवापर करून अॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल करीत आहेत, अशांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. भटके विमुक्त जाती-जमातीसाठी स्वतंत्र केंद्रीय अनुसूची करण्यात यावी, त्यांनाही अॅट्रॉसिटीच्या कायद्यानुसार संरक्षण देण्यात यावे, त्यांच्यासाठी जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी प्रमाणपत्राच्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात, कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे, मराठा समाजालाही ओबीसीचे आरक्षण कायम ठेवून आरक्षण देण्यात यावे, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायदा कडक करण्यात यावा आदींसह विविध मागण्या या बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या. मोर्चा दुपारी २.३० वाजता जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चात विविध संघटनांच्या पदाधिका-यांनी आपले विचार मांडले. मोर्चात लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
कॅशलेसपेक्षा देश ‘कास्ट’लेस करा...
केंद्रातील सरकारने कुठलीही उपाययोजना न करता नोटाबंदीचा निर्णय घेत देश कॅशलेस करण्याची योजना आखली आहे. कॅशलेसपेक्षा प्रथम देश ‘कास्ट’लेस केला पाहिजे. त्याशिवाय बहुजन समाजाचा विकास होणार नाही. केंद्र आणि राज्यातील सरकार हे बहुजनांच्या विरोधातील आहे. सरकारचे डावपेच वेळीच ओळखा आणि ते हाणून पाडा, असेही आवाहन मोर्चातील पदाधिका-यांनी बोलताना केले.
विविधरंगी झेंड्यांनी वेधले लक्ष...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून निघालेल्या बहुजन क्रांती मोर्चात वेगवेगळ्या मागण्यांचे फलक आणि विविध रंगी झेंड्यांनी लक्ष वेधून घेतले. ‘ए आझादी झुटी है, देश की जनता भुखी है’, ‘आमचे हक्क मिळालेच पाहिजेत’, ‘आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत’, ‘भूमिहिनांना शासकीय जमिनी वाटप करण्यात याव्यात,’ आदी मागण्याही यावेळी मोर्चेक-यांनी केल्या.