बहुजन नेतेच पराभूत झाले; पक्ष नव्हे, नेतृत्व जबाबदारः एकनाथ खडसेंचा वार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 06:46 PM2019-12-04T18:46:46+5:302019-12-04T18:56:37+5:30
105 आमदार असूनही भाजपाला विरोधात बसायला लागल्यानं भाजपातले दुखावले गेलेले नेते आता सक्रिय झाले आहेत.
मुंबई- 105 आमदार असूनही भाजपाला विरोधात बसायला लागल्यानं भाजपातले डावलले गेलेले नेते दुखावले गेले असून, आता ते सक्रिय झाले आहेत. विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे अशा नेत्यांनी भाजपांतर्गत दबाव वाढवण्यास सुरुवात केली. त्याच पार्श्वभूमीवर आधी विनोद तावडेंनीएकनाथ खडसेंची भेट घेतली होती, त्यानंतर एकनाथ खडसेंनी पंकजा मुंडेंची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. एकनाथ खडसेंनी पंकजा मुंडेंबरोबरच्या भेटीनंतर माध्यम प्रतिनिधींशी संवादही साधला.
दुर्दैवानं ओबीसी नेत्यांना डावलण्याचा भाजपा प्रयत्न करत आहे. बहुजन समाज आणि ओबीसींचं नेतृत्व करणारे नेते आहेत, तेच या ठिकाणी हरलेले दिसतायत. पंकजाताईंचा पराभव असो किंवा बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहतांना तिकीट न देण्याचा प्रकार हा दुर्दैवी आहे, तसेच ओबीसी नेत्यांचाच पराभव झालेला आहे. कारण काय असतील ते नंतर तपासू, महाराष्ट्रात जे 105 लोक आले, त्यापेक्षा अधिक आले असते तर पुनर्रचना झाली असती. प्रथमदर्शनी तरी असं दिसतंय आणि ज्यांनी ज्यांनी पक्षविरोधी काम केलेलं आहे, अशांची नावं मी स्वतः माननीय अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे दिलेली आहेत. त्यांनी कारवाई करावी ही अपेक्षा केलेली आहे, असंही एकनाथ खडसे म्हणालेले आहेत.
तत्पूर्वी खडसे म्हणाले होते, भाजपासमोर काहीही आव्हानं नाहीत, भाजपा पक्ष सध्या तरी एकसंध आहे. पक्षामध्ये एकजूट आहे आणि योग्य वेळी तुम्हाला दिसून येईल. जस जशा निवडणुका येतील, त्या त्या वेळी योग्य काय ते दिसून येईल. पंकजाताईंची काही भेट घेतलेली नाही. पंकजाताईंची भेट घेण्याची काही आवश्यकता नाही. गोपीनाथ गडावर दरवर्षी जातो आणि आताही जाणार आहे. या वर्षीसुद्धा जाणार आहे. सध्या तरी वेगवेगळे मतप्रवाह समोर आलेले नाहीत. मीडियाच्या माध्यमातून बरीचशी माहिती समजल्याचा टोलाही खडसेंनी लगावला आहे. तर विनोद तावडेंनी काहीही बोलण्यास नकार दिला.