बहुजन मोर्चाने नगर दणाणले
By Admin | Published: October 24, 2016 09:50 PM2016-10-24T21:50:23+5:302016-10-24T21:50:23+5:30
अॅट्रासिटी कायद्याची अधिक कडक अंमलबजावणी करावी, तसेच मराठा, मुस्लीम, ख्रिश्चनांना आरक्षण दिले जावे यांसह एकवीस मागण्यांसाठी सोमवारी अहमदनगर शहरात विराट बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला.
ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 24 : अॅट्रासिटी कायद्याची अधिक कडक अंमलबजावणी करावी, तसेच मराठा, मुस्लीम, ख्रिश्चनांना आरक्षण दिले जावे यांसह एकवीस मागण्यांसाठी सोमवारी अहमदनगर शहरात विराट बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. निळा, पिवळा, भगवा, लाल असे विविध झेंडे व घोषणांनी शहर दणाणून गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा-दलित वाद लावला, असा गंभीर आरोप ‘बामसेफ’चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी या मोर्चाला संबोधित करताना केला.
या मोर्चासाठी सकाळपासूनच जिल्ह्याच्या विविध भागांतून जनसमुदाय नगर शहरात येत होता. विविध रंगांचे झेंडे हातात घेऊन मोर्चेकरी वाडिया पार्कवर दाखल झाले. ‘एकच गर्व, बहुजन सर्व’, ‘एकच साहेब, बाबासाहेब’, ‘तुम भी देखो आँखे से, हम थी आये लाखोंसे’, अशा घोषणा दिल्या जात होत्या. दुपारी दीडच्या सुमारास वाडिया पार्कचे क्रीडांगण भरले होते. भर उन्हात महिला, मुले आणि तरुणांची मोठी गर्दी होती. दलित, ओबीसी, भटके विमुक्त, आदिवासी, धनगर, मुस्लीम, वंजारी अशा विविध समाजांचे नेते-कार्यकर्ते मोर्चासाठी एक झाले होते. वाडिया पार्कमध्ये वामन मेश्राम, मोर्चाचे निमंत्रक विजय वाकचौरे, अशोक गायकवाड, प्रा. किसन चव्हाण, अॅड. अरुण जाधव, माजी आमदार पांडुरंग अभंग आदी नेत्यांची भाषणे झाली. अॅट्रॉसिटी कायद्याच्या रक्षणासाठी एकी कायम ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. जे लोक दलितांचा वापर करुन खोट्या अॅट्रॉसिटी दाखल करायला लावतात त्यांच्याविरुद्धही अॅट्रॉसिटी कायद्यानेच गुन्हा दाखल व्हावा, भटक्या विमुक्तांनाही अॅट्रॉसिटीच्या कायद्याचे संरक्षण द्यावे, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जावे, शेतमालाला हमी भाव देण्यात यावा आदी मागण्या मोर्चात करण्यात आल्या. वाडिया पार्कनंतर मोर्चा चांदणी चौकात आला. तेथे राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले. शिर्डी येथील हत्या झालेला दलित युवक सागर शेजवळ व खर्डा येथे हत्या झालेला नितीन आगे याच्या कुटुंबीयांच्या हस्ते जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
बहुजन मोर्चामुळे शहरातील बहुतांश शाळांनी प्रथम सत्रांच्या परीक्षेचा पेपर रद्द करून सुटी जाहीर केली होती. शासकीय कार्यालयांत शुकशुकाट होता. बाजारात गर्दी नसल्याने दिवाळी खरेदीवर परिणाम झाला. विविध संघटनांनी मोर्चेकऱ्यांसाठी पाणी, चहा, नाश्त्याची व्यवस्था केली होती. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. शहरातून जाणारी वाहतूक बाहेरुन वळविण्यात आली होती.