बाई गं... गॅस नको, आपली चूलच बरी!
By Admin | Published: March 2, 2017 01:23 AM2017-03-02T01:23:02+5:302017-03-02T01:23:02+5:30
गॅस सिलिंडरच्या टाक्यांच्या किमतीत भरमसाट वाढ होत असल्यामुळे ग्रामीण भागातील अर्थकारण बिघडले आहे.
काऱ्हाटी : एकीकडे आर्थिक मंदी, दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या टाक्यांच्या किमतीत भरमसाट वाढ होत असल्यामुळे ग्रामीण भागातील अर्थकारण बिघडले आहे. त्यामुळे विशेषत: महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा धुराच्या चुली पेटत असल्याचे चित्र आहे. धुरामुळे महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. त्यामुळे गॅस वापर अधिक व्हावा, यासाठी प्रचार, प्रसार होत असताना सध्या उलटे चित्र दिसत आहे.
केंद्र सरकारने मध्यंतरी गॅसवरील अनुदान बंद केले. तसेच, काही गॅस सिलिंडर अनुदानावर सवलत देण्याची घोषणा केली. मात्र, विनाअनुदानित गॅस सिलिंडर सुरुवातीला पूर्ण रक्कम भरून घ्यावी लागते.
पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे शेतीच्या मशागतीच्या खर्चात वाढ होत आहे. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलिंडरच्या एका टाकीमागे जवळपास ५०० रुपयांची वाढ झाली आहे. आज १ मार्चपासून ९० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे ग्रामीण भागात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ दाखवणाऱ्या सरकारने महिला, गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणण्याचे काम केले आहे. भरमसाट वाढवलेल्या किमतीमुळे घरगुती गॅस परवडेनासा झाला आहे. या सरकारने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचे काम केले आहे. पेट्रोलचा दर अकरा महिन्यांत तब्बल १७ रुपयांनी व घरगुती गॅस सिलिंडरच्या एका टाकीमागे ५०० रुपयांनी भरमसाट वाढ केली आहे. शेतकऱ्याच्या शेतमालाला बाजारभाव देण्याबाबत शासन कोणतेच पाऊल उचलत नाही. मात्र, शेतकऱ्यांकडे पिकत नसलेल्याच्या किमतीत भरमसाट वाढ केली आहे.
जिरायती भागातील खेड्यापाड्यात तसेच वाड्या-वस्त्यांमध्ये चुली पेटू लागल्या आहेत. एकीकडे पैसा पाहावयास मिळेना, त्यातच वाढलेल्या गॅसच्या किमतीमुळे स्वयंपाकासाठी शेतकरी महिलांना सरपण गोळा करण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. त्यामुळे स्वयंपाकासाठीपूर्वीचे दिवस पाहण्याची वेळ आली असल्याचे काऱ्हाटीच्या सुजाता लोणकर या सुशिक्षित महिलेने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.