बैजू पाटील यांना जपानचा ‘नेचर बेस्ट एशिया’ पुरस्कार
By Admin | Published: July 14, 2017 04:44 AM2017-07-14T04:44:15+5:302017-07-14T04:44:15+5:30
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविणारे प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांना जपानचा ‘नेचर बेस्ट एशिया’ पुरस्कार जाहीर झाला
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : वन्यजीव छायाचित्रणात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविणारे प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांना जपानचा ‘नेचर बेस्ट एशिया’ पुरस्कार जाहीर झाला आहे. जपानमधील टोकियो येथे आॅगस्ट महिन्यात होणाऱ्या एका सोहळ््यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येईल.
बैजू यांनी गोव्यातील महावीर अभयारण्यात काढलेल्या ‘मलबार ग्लायडिंग फ्रॉग’ची आशियातील ८,५०० छायाचित्रांतून ‘हायली आॅनर्ड’ प्रकारात निवड झाली. या बेडकाचा रंग पूर्णपणे हिरवा असून एखादा कोळी (स्पायडर) झाडांच्या पानांवर जसा फिरतो त्याप्रमाणेच हा बेडूक फिरत असतो.
भरपावसात टिपले छायाचित्र ‘मलबार ग्लायडिंग फ्रॉग’ हा केवळ कोकण आणि गोव्यातच आढळतो. त्याचे छायाचित्र काढण्यासाठी गोवा हे उत्तम ठिकाण आहे. संततधार पावसातच त्याचे छायाचित्र काढावे लागते. काळोखात बेडकाची आउटलाइन दिसेल, असे छायाचित्र त्यांना अपेक्षित होते. त्यामुळे कॅमेरा आणि लेन्सचे ओझे घेऊन जंगलातून त्यांना ४ ते ५ किलोमीटरपर्यंत पायी प्रवास करावा लागला. आवाजावरून त्याचा माग काढावा लागतो. साप, विंचू आणि दलदलीच्या भागात अतिशय सांभाळून जावे लागते. या सर्व अडचणींवर मात करीत भरपावसात बैजू यांनी कॅमेरा, फ्लॅशला पूर्णपणे प्लास्टिकने झाकून हे छायाचित्र टिपले आहे.
>हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जातो. भारतात तो पहिल्यांदाच मिळाला आहे. ‘मायक्रो वर्ल्ड’ कॅटॅगरीमधील हा पुरस्कार आहे. या पुरस्कारासाठी मी गोव्यात टिपलेले छायाचित्र पाठविले होते. सध्या डिजिटल टेक्नॉलॉजीचा फोटोसाठी वापर होतो. यामुळे पुरस्कार देताना फोटोचा शार्पनेस, क्वालिटी ही तर पाहिली जातेच; परंतु फोटो कोणत्या पद्धतीने टिपला आहे, याचाही विचार होतो. फोटोचा विषय हा शास्त्रीय आहे की नाही, हे पाहिले जाते. अत्यंत आनंद देणारा हा पुरस्कार आहे.
- बैजू पाटील
>वन्यजीव कॉफी टेबल बुक : बैजू पाटील यांच्या वन्यजीव कॉफी टेबल बुकचे प्रकाशन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले होते. राजभवनात एका शानदार कार्यक्रमात हा प्रकाशन सोहळा पार पडला होता.
>३२ पुरस्कारांनी सन्मान : बैजू पाटील यांनी आतापर्यंत शाळा, महाविद्यालयांमध्ये पर्यावरण आणि प्राणी वाचवण्यासंदर्भात जनजागृतीपर अनेक कार्यक्रम घेतले आहेत. आतापर्यंत त्यांना वन्यजीव छायाचित्रणातील ३२ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाले आहेत.