सुरेशदादा जैन यांना जामीन
By admin | Published: September 3, 2016 06:52 AM2016-09-03T06:52:12+5:302016-09-03T06:52:12+5:30
घरकूल प्रकरणात गेल्या साडेचार वर्षांपासून अटकेत असलेले माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने बिनशर्त जामीन मंजूर केला. सध्या सुरेशदादा धुळे
जळगाव : घरकूल प्रकरणात गेल्या साडेचार वर्षांपासून अटकेत असलेले माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने बिनशर्त जामीन मंजूर केला. सध्या सुरेशदादा धुळे कारागृहात असून जामिनाची पूर्तता केल्यानंतर ते शनिवारी जळगावात येण्याची शक्यता आहे.
तत्कालीन जळगाव नगरपालिकेने हुडकोकडून कर्ज व राज्य शासनाची हमी घेऊन शहरातील ९ ठिकाणी झोपडपट्टीवासीयांसाठी घरकूल बांधण्याची योजना हाती घेतली होती. मात्र या योजनेत गैरव्यवहार झाल्याची फिर्याद तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दिली होती. सहा वर्षांनंतर या गुन्ह्याच्या तपासासाठी इशू सिंधू या आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. सुरेशदादा जैन यांना १० मार्च २०१२ रोजी रात्री साडेअकरा वाजता अटक झाली होती. तेव्हापासून ते अटकेतच होेते.
१२व्या अर्जावर जामीन
सुरेशदादा जैन यांनी जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात तब्बल ११ वेळा दाखल केलेले जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर १२वा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने बिनशर्त मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयात आज सुरेशदादांच्या जामीन अर्जावरील सुनावणीचा ५० वा नंबर होता. तो सकाळी ११.३०च्या सुमारास सुनावणीसाठी बोर्डावर आला. त्यावेळी न्यायालयाने खटल्याची सद्यस्थिती काय? अशी विचारणा केली. त्यावेळी सुरेशदादा जैन यांचे वकील अॅड.कपिल सिब्बल यांनी सांगितले की, या खटल्यातील महत्त्वपूर्ण साक्षी पूर्ण झाल्या आहेत. तसेच आमचा अशील गेल्या साडेचार वर्षांपासून कारागृहात आहे, असे मुद्दे मांडले. न्यायालयाने ते ग्राह्य धरीत ५ लाख रुपये सुरक्षा अनामत भरण्याचे आदेश देत बिनशर्त जामीन मंजूर केला.
अशा झाल्या घडामोडी
घरकूल खटला सध्या धुळे येथील न्या.आर.आर. कदम यांच्या विशेष न्यायालयात सुरू आहे. फिर्यादी प्रवीण गेडाम व तपास अधिकारी ईशु सिंधू यांच्यासह प्रमुख साक्षीदारांच्या साक्ष व उलटतपासणीचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. माफीच्या साक्षीदार सिंधू कोल्हे यांना आरोपी करण्याचा निर्णय धुळे येथील विशेष न्यायालयाने दिला. त्यानंतर २९ आॅगस्ट रोजी सुरेशदादा जैन यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दिला. त्यात या प्रकरणातील सर्व साक्षीदारांच्या साक्षी संपल्या असून अशील साडेचार वर्षांपासून अटकेत असल्याचा मुद्दा मांडत १३ सप्टेंबर रोजी असलेली जामीन अर्जावरील सुनावणी लवकर घेण्याची मागणी केली. न्यायालयाने ती मागणी मान्य करीत शुक्रवार २ सप्टेंबर रोजी सुनावणी घेतली.
धुळे येथील विशेष न्यायालयात माजी नगराध्यक्ष सिंधू कोल्हे यांच्यावर आरोप निश्चितीचे कामकाज सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजुरीचे वृत्त पोहोचले. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर सुरेशदादा जैन शनिवारी जळगावात पोहोचण्याची शक्यता आहे.