बेळगावच्या मेजरने केली मृत्यूवर मात
By admin | Published: January 28, 2017 01:23 AM2017-01-28T01:23:06+5:302017-01-28T01:23:06+5:30
हिमस्खलन : कुलपाने बर्फ फोडून तीन तासांनी बाहेर
बेळगाव : जम्मू-काश्मीर येथे झालेल्या हिमस्खलनात बर्फाखाली अडकलेल्या येळ्ळूर (जि. बेळगाव ) येथील मेजर श्रीहरी कुगजी यांनी साक्षात मृत्यूला हरविले. बर्फामळे छावणीचे छप्पर कोसळल्याने ते गाडले होते. त्याही परिस्थितीत कुलुपाने तीन तास बर्फ फोडून त्यांनी स्वत:ची सुटका करुन घेतली.
श्रीहरी सोनमर्ग येथे सेवा बजावत आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्ठी सुरु आहे. हिमस्खलन झाल्यावर त्यांच्या छावणीचे छप्पर बर्फाच्या ओझ्याने कोसळल्यामुळे खाली आले. काही कळायच्या आतच श्रीहरी बर्फाखाली गाडले गेले.
पंधरा फूट बर्फाखाली अडकल्यामुळे काही क्षण काय करावे हे त्यांना सुचले नाही. पण लगेच त्यांनी हालचाल करण्यास सुरुवात केली. त्यांच्या हाताला ट्रंकचे कुलूप मिळाले. त्यामुळे जमेल तसा ते कुलूपाच्या साह्याने बर्फ फोडू लागले. अखेर बोट बाहेर पडण्याइतकी जागा त्यांनी तयार केली. बोटे बर्फाबाहेर काढून हलवत असताना बचाव आणि शोधकार्यासाठी आलेल्या पथकाला त्यांची बोटे दिसली आणि त्यांना बाहेर काढण्यात आले. श्रीहरी मृत्यूच्या जबड्यातून बाहेर आल्याची माहिती मिळताच त्यांच्या आई-वडिलांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. श्रीहरी महार रेजिमेंटमध्ये मेजर आहेत. सहा महिन्यांपूर्वी ते बेळगावात सेवा बजावत होते.
सध्या त्यांची नेमणूक रेजिमेंट सोनमर्ग येथे असल्याने ते जम्मू-काश्मीरमध्ये सेवा बजावत आहेत. निवृत्त मेजर सुभेदार अनंत कुगजी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, श्रीहरी सुखरूप असल्याचा फोन आल्यावर आनंद झाला असला तरी इतर जवान शहीद झाल्याचे दु:ख आहे. (प्रतिनिधी)
सैनिकी परंपरा
येळ्ळूर गावचे श्रीहरी कुगजी यांचे वडील देखील १ मराठामध्ये सुबेदार मेजर म्हणून निवृत्त झाले आहेत. बहीण पंकजादेखील एनडीए करून सध्या जैसलमेरमध्ये इ.एम.ई.मध्ये सेवा बजावत आहेत. श्रीहरी यांची पत्नी मुंबईत वास्तव्यास असून, त्यांना अत्रेय हा चार वर्षाचा मुलगा आहे.