बजाज आॅटोत आता पाच दिवसांचा आठवडा
By admin | Published: May 12, 2016 04:28 AM2016-05-12T04:28:45+5:302016-05-12T04:28:45+5:30
मराठवाड्यातील सर्वात मोठा उद्योग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाळूजच्या बजाज आॅटोला दुष्काळाचा फटका बसला आहे. या कारखान्यात पाच दिवसांचा आठवडा जाहीर करण्यात आला आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठा उद्योग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाळूजच्या बजाज आॅटोला दुष्काळाचा फटका बसला आहे. या कारखान्यात पाच दिवसांचा आठवडा जाहीर करण्यात आला आहे. रविवारच्या साप्ताहिक सुटीसह आता शनिवारीही कारखाना बंद ठेवला जाणार आहे.
भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे संपूर्ण मराठवाडा पाणीटंचाईच्या संकटाशी सामना करीत आहे. औरंगाबाद व जालन्यातील उद्योगांना पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणातील जिवंत पाणीसाठा केव्हाच संपला असून, मृतसाठ्यातून पाण्याचा उपसा केला जात आहे. बजाज आॅटोने पाणीबचतीसाठी यापूर्वीच विविध उपाययोजना केल्या आहेत; परंतु सर्वात कठोर
निर्णय घेताना आता एक दिवस उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय
घेतला आहे.
कंपनीच्या कमर्शियल व्हेईकल प्लँटमध्ये दैनंदिन उत्पादनात वाढ करून आठवड्याचे कामकाज सहाऐवजी पाच दिवस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, याचा उत्पादनावर कसलाही परिणाम होणार नसल्याचे बजाज आॅटोचे उपाध्यक्ष (मॅन्युफॅक्चरिंग) डी. एन. नार्वेकर यांनी सांगितले.