बजाज कामगारांचे उपोषण
By admin | Published: October 3, 2016 02:05 AM2016-10-03T02:05:52+5:302016-10-03T02:05:52+5:30
चाकण प्लॅण्टमधील कामगारांच्या विविध मागण्यांसाठी रविवारी विश्वकल्याण कामगार संघटनेच्या वतीने आकुर्डी येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
पिंपरी : बजाज कंपनीच्या आकुर्डी आणि चाकण प्लॅण्टमधील कामगारांच्या विविध मागण्यांसाठी रविवारी विश्वकल्याण कामगार संघटनेच्या वतीने आकुर्डी येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
आकुर्डीतील बजाज कंपनीसमोरील शहीद दत्ता पाडाळे यांच्या पुतळ्यासमोर कामगार उपोषणाला बसले होते. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आॅगस्ट २०१४ ला कामगारांना दहा हजार रुपये पगारवाढ देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर दोन वर्षांत ३० ते ४० टक्के महागाई वाढली आहे. त्यामुळे मागील पगारवाढीपेक्षात्यामध्ये ४० टक्के वाढ मिळावी. तसेच कामगारांच्या मेडिक्लेमसाठी कंपनी दोनशे रुपये भरत असताना कामगार मात्र ७५० रुपये भरत आहे. तर याच मेडिक्लेमसाठी सुपरवायजर आणि स्टाफचे पैसे कंपनी भरत असून, हा भेदभाव कशासाठी असा प्रश्न संघटनेने उपस्थित केला आहे. तरी कामगारांच्या संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी कंपनी घ्यायला हवी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार आणि बाळासाहेब थोरवे यांनी केली आहे.
यासह निलंबित कर्मचाऱ्यांची चौकशी झाल्यानंतर त्यांना पुन्हा कामावर घेऊ, असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, अद्याप त्यांना कामावर घेण्यात आलेले नाही. हे प्रश्न व्यवस्थापनाने लवकरात लवकर सोडवावेत, या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. आंदोलनाला विविध कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे. तसेच कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)