औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी बजरंग दल, विहिंपची मोहीम, ‘बाबरी’ पुनरावृत्तीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 06:31 IST2025-03-16T06:30:02+5:302025-03-16T06:31:30+5:30

कारसेवा करून कबर हटवण्याचा इशारा; उद्या राज्यभर आंदोलन, खुलताबाद येथील कबर परिसरात चोख बंदोबस्त

Bajrang Dal, VHP campaign to remove Aurangzeb's tomb, warning of 'Babri' repeat | औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी बजरंग दल, विहिंपची मोहीम, ‘बाबरी’ पुनरावृत्तीचा इशारा

औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी बजरंग दल, विहिंपची मोहीम, ‘बाबरी’ पुनरावृत्तीचा इशारा

छत्रपती संभाजीनगर/पुणे : छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ औरंगजेबाची कबर हटवा, अशी मोहीम विहिंप, बजरंग दलाने शिवजयंतीला हाती घेतली आहे. औरंगजेबाची कबर न हटवल्यास ‘बाबरी’ची पुनरावृत्ती करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, खुलताबाद येथील कबर परिसरात पोलिस फौजफाटा मोठ्या प्रमाणात वाढवून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री किशोर चव्हाण, बजरंग दलाचे प्रांत संयोजक नितीन महाजन आणि प्रांत सहसंयोजक संदेश भेगडे यांनी पुण्यात संयुक्त पत्रपरिषदेत सांगितले, की औरंगजेबाची कबर गुलामगिरी, लाचारी व अत्याचारांची आठवण करून देणारी आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर ही कबर काढावी; अन्यथा हिंदू समाज रस्त्यावर उतरत आंदोलन करेल, मोर्चे काढेल व आवश्यकता भासल्यास चक्काजाम व कारसेवा करून ती कबर उद्ध्वस्त करेल.  

उद्या राज्यभरात आंदोलन
कबर हटवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी आंदोलन करण्यात येणार आहे. तिथीप्रमाणे छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून सोमवारी स. ११:३० वाजता पुण्यासह राज्यातील तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयांबाहेर आंदोलन केले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन दिले जाईल, अशी माहिती विहिंपने दिली.

तर कारसेवेसाठी कूच करू - 
बजरंग दलाचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे क्षेत्र संयोजक विवेक कुलकर्णी यांनी अहिल्यानगर येथे पत्रकार परिषद घेऊन औरंगजेबाची कबर शासनाने खणून काढावी, आलमगीर हे नाव कोठेही असू नये, अन्यथा बजरंग दलाचे लाखो कार्यकर्ते संभाजीनगरकडे कारसेवेसाठी कूच करतील, असा इशारा त्यांनी दिला.

पोलिसांबरोबरच पुरातत्त्व विभागाचेही कर्मचारी तैनात -
विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा, ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी औरंगजेब कबर परिसराची पाहणी करून बंदोबस्त तैनात केला आहे. मुख्य रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात आहे. औरंगजेबाची ही कबर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने पोलिसांबरोबरच पुरातत्त्व विभागानेही कर्मचारी तैनात केले आहे.
 
एसआरपीएफचे ११५ शस्त्रधारी जवान, दंगल नियंत्रण पथकाच्या २५ पोलिस जवानांसह ६० पोलिस अंमलदार नियुक्त केले आहेत. कबर परिसरात जाताना २ ठिकाणी नाकेबंदी लावण्यात आली आहे. कबरीकडे जाणाऱ्या पर्यटकांची कसून तपासणी केली जात आहे.

संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे यांच्यासह त्यांच्या समर्थकांविरोधात शनिवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रवेशबंदीचे आदेश जारी झाले आहेत.

औरंगजेबाजवळ पैसा, मनुष्यबळ, शस्त्रे अमाप होती. इथे २७ वर्षे राहूनही त्याला राज्य करता आले नाही, हे जगाला दाखवण्यासाठी त्याच्या कबरीला हात लावू नये, असे मला वाटते.
आ. रोहित पवार, शरद पवार गट

औरंगजेबाची कबर हटविलीच पाहिजे ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. हिंदूंवर अन्याय-अत्याचार करणाऱ्याची कबर हवीच कशाला? ती तत्काळ हटवा.
संजय शिरसाट, मंत्री व शिंदेसेनेचे नेते

मराठेशाहीने औरंगजेबाचे मनसुबे उधळून लावले. औरंगजेबासारख्या अत्याचारी मुघलाला इथे कबरीत गाडले गेले, हे आजच्या आणि येणाऱ्या पिढ्यांना दाखवलेच पाहिजे.
खा. अरविंद सावंत, उद्धवसेना.

रावणाला बाजूला करून रामायण सांगता येईल का? अफजल खान बाजूला करून प्रतापगडाची लढाई सांगता येईल का? औरंगजेब कबर हटाव मोहीमेला सरकारचा देखील छुपा पाठिंबा आहे.
जितेंद्र आव्हाड, शरद पवार गट

Web Title: Bajrang Dal, VHP campaign to remove Aurangzeb's tomb, warning of 'Babri' repeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.