मराठा आंदोलनाचा इम्पॅक्ट; बीडमधील विजयानंतर बजरंग सोनावणे मध्यरात्री मनोज जरांगेंच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 11:09 AM2024-06-05T11:09:25+5:302024-06-05T11:17:38+5:30
Bajrang Sonawane News: बीडमध्ये विजय मिळाल्यानंतर बजरंग सोनावणे यांनी रात्री अडीच वाजता अंतरवाली सराटी गाठून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
Bajrang Sonawane News: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. अनेक विद्यमान खासदारांना पराभव पत्करावा लागला. बीडमध्ये भाजपाच्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. चुरशीच्या लढतीत अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली. या विजयात मराठा आंदोलनाचा फॅक्टर कामी आला, असे बजरंग सोनावणे यांनी सांगितले. तर मध्यरात्री अडीच वाजता मनोज जरांगे यांची जाऊन भेटही घेतली.
लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात रोमहर्षक लढत ठरलेल्या बीड मतदारसंघात शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा तब्बल ७ हजारांनी पराभव केला. बीडमध्ये विजय मिळाल्यानंतर बजरंग सोनावणे यांनी रात्रीच अंतरवाली सराटी गाठून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. रात्री अडीच वाजता बजरंग सोनावणे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीमुळे बीडमध्ये जरांगे फॅक्टरने बजरंग सोनावणे यांची ताकद वाढवल्यावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.
या आरक्षणाचा प्रश्न मी संसदेत मांडणार
बीडमधील विजयानंतर पत्रकारांशी बोलताना बजरंग सोनावणे यांना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयीही प्रश्न विचारला. जरांगे पाटील फॅक्टर तुमच्या मतदारसंघात कामी आला का? या प्रश्नावर बोलताना सोनवणे म्हणाले की, १०० टक्के हा फॅक्टर कामी आला. मराठा आरक्षण चळवळीचा मला फायदा होईल आणि या आरक्षणाचा प्रश्न मी संसदेत मांडणार, असेच मी सुरुवातीपासून बोलत आहे.
दरम्यान, बीड मतदारसंघातील मतमोजणी सुरू असताना २४ व्या फेरी अखेर भाजपाच्या पंकजा मुंडे यांना ३० हजार ४६१ मतांची आघाडी होती. मात्र, २५ व्या फेरीपासून ही आघाडी घटू लागली. २५ व्या अखेर २२ हजार ५००, २६ वी फेरी १० हजार २७६ , २७ वी फेरी ७ हजार ४२८ अशी आघाडी कमी होत गेली. तर २८ व्या फेरीत बजरंग सोनवणे यांनी ९३२ मतांची आघाडी घेतली. त्यानंतर २९ व्या फेरीत १ हजार २१७, ३० वी फेरी २ हजार ६०२ मतांची आघाडी घेतली. मात्र, ३१ व्या फेरीत पुन्हा पारडे फिरले अन् पंकजा मुंडे ४०० मतांनी पुढे आल्या. परंतु, फेरमतमोजणीची मागणी केल्यानंतर झालेल्या मतमोजणीत शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे ७००० मतांनी विजयी झाले.