'बालभारती'कडून मिळाले एसटीला पैशाचे 'धडे'; ४ वर्षांची सेवा, लाभला २ कोटींचा मेवा
By नरेश डोंगरे | Published: July 30, 2023 02:35 PM2023-07-30T14:35:48+5:302023-07-30T14:35:57+5:30
एसटी महामंडळाने मे २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत ३०० किलोमिटरचा 'बाल भारती'ला प्रवास घडविला.
नागपूर : प्रत्येकाला ज्ञानाच्या तिजोरीचे दार सताड उघडे करून देणाऱ्या 'बाल भारती'ने राज्य परिवहन महामंडळालाही (एसटी) पैशाचे धडे दिले आहे. एसटीने चार वर्षांत बाल भारतीची ज्ञानगंगा राज्यातील अनेक भागात प्रवाहित केली. त्याबदल्यात 'बाल भारती'नेही एसटीच्या तिजोरीत २.१२ कोटींची गंगाजळी ओतली.
आधी शाळेचा पहिला पाठ, पहिली ओळख 'बाल भारती'पासून सुरू होत होता. 'बाल भारती' हातात आल्यानंतर ज्ञानगंगेची ओळख व्हायला सुरूवात होते आणि नंतर हळुहळू जगण्या-जगविण्याचा मार्गही प्रशस्त होतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात 'बाल भारती'ची ज्ञानगंगा सर्वत्र आढळते. ती प्रवाहित होण्यासाठी एसटीही गेल्या चार वर्षांपासून महत्वाची भूमिका वठवित आहे. गावोगावी 'बाल भारती'ला पोहचविण्याचे काम एसटी गेल्या चार वर्षांपासून करीत आहे. त्या बदल्यात 'बाल भारती'कडून एसटीला लक्ष्मीदर्शन करवून दिले जात आहे.
एसटी महामंडळाने मे २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत ३०० किलोमिटरचा 'बाल भारती'ला प्रवास घडविला. या बदल्यात बाल भारतीने एसटीला १४ हजार रुपये दिले. २०२२ मध्ये बाल भारतीच्या मालवाहतुकीसाठी एसटीला १ कोटी, ११ लाख, ७० हजार, ८१७ रुपये मिळाले. तर, मार्च २०२३ पर्यंत ५२लाख, ७४हजार, २१४ आणि आता एप्रिल ते जून २०२३ पर्यंत ३६ लाख, ६६ हजार, ५५ रुपये बाल भारतीने एसटीला दिले. अशा प्रकारे २०२० ते २०२३ या चार वर्षांच्या कालावधीत एसटीकडून बाल भारतीची मालवाहतुकीच्या माध्यमातून जी सेवा झाली त्या बदल्यात एसटीला बाल भारतीकडून २ कोटी, १ लाख, २५ हजार, ८६ रुपयांचा मेवा मिळाला. अभय कोलारकर यांनी एसटीच्या मुख्यालयात मागितलेल्या माहितीतून हे स्पष्ट झाले आहे.
माल वाहतूक कराराचे फलित
उपरोक्त चार वर्षांत एसटीने नागपूर, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर विभागात बाल भारती सोबत माल वाहतूक करण्याचा करार केला होता. त्यानुषंगाने एसटीला हा लाभ मिळाला आहे.