बालभारतीची पुस्तके जगाशी ‘बोलणार’
By admin | Published: March 13, 2017 04:10 AM2017-03-13T04:10:24+5:302017-03-13T04:10:24+5:30
क्यूआर कोड वापरून ‘बोलकी’ झालेली बालभारतीची पुस्तके आता अवघ्या जगासोबत संवाद साधणार आहेत. कॅनडामध्ये होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्रातील ‘बोलक्या’ पुस्तकांना
अविनाश साबापुरे, यवतमाळ
क्यूआर कोड वापरून ‘बोलकी’ झालेली बालभारतीची पुस्तके आता अवघ्या जगासोबत संवाद साधणार आहेत. कॅनडामध्ये होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्रातील ‘बोलक्या’ पुस्तकांना मानाचे निमंत्रण मिळाले आहे. अध्ययन अक्षम असलेल्या कोणत्याही देशातील विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तके वापरता येतील का, याचा अदमास परिषदेत घेतला जाणार आहे.
चालू शैक्षणिक सत्रात इयत्ता सहावीची नवी पाठ्यपुस्तके तयार करताना बालभारतीने त्यात क्यूआर कोड वापरला. या पुस्तकांत पानापानावर विशिष्ट टॅग लावण्यात आला आहे. त्यामुळे पुस्तकातील कविता मोबाईलमध्ये ऐकता येते किंवा पुस्तकातील चित्रावर मोबाईल ठेवल्यास त्या चित्राशी संबंधित व्हिडिओ मोबाईलमध्ये बघता येतो. मुलांना पाठ्यपुस्तकांकडे आकृष्ट करणारा हा प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले या शिक्षकाने सर्वप्रथम आपल्या शाळेत केला. तोच नंतर बालभारतीने स्वीकारून राज्यभरातील सहावीच्या १८ लाख पुस्तकांमध्ये वापरला. आता हाच प्रयोग जगभरातील शिक्षणप्रेमींपुढे ठेवण्यासाठी आमंत्रण आले आहे.
शिक्षणात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करावा, याबाबत मायक्रोसॉफ्टच्या वतीने टोरांटो (कॅनडा) येथे २१ ते २४ मार्च दरम्यान आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. त्यात विविध देशातील ३०० तंत्रस्नेही शिक्षणतज्ज्ञ सहभागी होणार आहेत.
भारतातील एकंदर आठ जणांना आपले शिक्षणविषयक प्रयोग सादर करण्याची यात संधी मिळणार आहे. दिल्ली, चेन्नई, पंजाबमधील ५ शिक्षिकांचा समावेश आहे. हे सर्व खासगी नामवंत शाळांमधील अध्यापक आहेत. एकमेव महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक म्हणून रणजितसिंह डिसले यांना मायक्रोसॉफ्टचे निमंत्रण आहे. पुस्तके ‘बोलकी’ केल्यावर ग्रामीण भागात राहणारे आणि विविध कारणांनी अध्ययनात मागे असणारे विद्यार्थीही गतीने अभ्यास करतात, हा प्रयोग ते जगापुढे ठेवणार आहेत.