बालाजी तांबे यांच्या पदवीबाबत संशय कायम
By admin | Published: September 29, 2016 01:02 AM2016-09-29T01:02:07+5:302016-09-29T01:02:07+5:30
आयुर्वेदाचार्य म्हणून ओळखले जाणारे बालाजी तांबे यांची वैद्यकीय पदवीच सापडत नसल्याचे वृत्त प्रकाशित होताच, तांबे यांनी आपल्या पदवीची झेरॉक्स प्रत ‘महाराष्ट्र कौन्सिल
अहमदनगर : आयुर्वेदाचार्य म्हणून ओळखले जाणारे बालाजी तांबे यांची वैद्यकीय पदवीच सापडत नसल्याचे वृत्त प्रकाशित होताच, तांबे यांनी आपल्या पदवीची झेरॉक्स प्रत ‘महाराष्ट्र कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसीन’कडे (एमसीआयएम) पाठविली आहे. उत्तर प्रदेशातील हिंदी साहित्य संमेलन या संस्थेनेही ही पदवी खरी असल्याचे पत्र लगोलग धाडले आहे. मात्र, ही कागदपत्रे वैध आहेत का? असा पेच आता ‘एमसीआयएम’ समोर आहे.
१९६५ साली उत्तर प्रदेशातील प्रयाग येथील हिंदी साहित्य संमेलन या संस्थेतून आपण ‘वैद्यविशारद’ झाल्याचे तांबे सांगतात. या पदवीच्या आधारे त्यांनी १९८७ साली ‘एमसीआयएम’कडे वैद्यकीय व्यवसायासाठी नोंदणी केली. मात्र, या नोंदणीचे १९९१ नंतर नूतनीकरणच झालेले नसतानाही ते डॉक्टर म्हणून सेवा करत आहेत. दरम्यानच्या काळात तांबे यांची पदवीच गायब झाली. आपली पदवी हरवल्याचे ते स्वत: सांगतात, तर ‘एमसीआयएम’च्या दप्तरीही त्यांची पदवी सापडत नाही. कौन्सिलने वारंवार मागणी केल्यानंतरही तांबे यांनी ती सादर केलेली नाही. ‘लोकमत’ने ही बाब उघडकीस आणली.
या वृत्तानंतर तांबे यांनी पदवीची झेरॉक्स प्रत पाठविली, तसेच प्रयागच्या संस्थेनेही ही पदवी खरी असल्याचे पत्र दिले असल्याचे ‘एमसीआयएम’चे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता यांनी सांगितले. मात्र, ही कागदपत्रे वैध आहेत का, याबाबत ‘एमसीआयएम’ काहीही खात्री देत नाही. वकिलांचा सल्ला घेऊन कागदपत्रांची खातरजमा करणार असल्याचे ते म्हणाले. तांबे यांनी उत्तर प्रदेशातील बोर्डाकडे आपली नोंदणी केली आहे का? याची तपासणी करण्यासाठीही डॉक्टरांचा ‘एमसीआयएम’वर दबाव वाढत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी याबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून, ‘एमसीआयएम’च्या २९ सप्टेंबरच्या बैठकीत या विषयावर चर्चा करण्याची मागणी प्रबंधकांकडे केली आहे. नोंदणीचे नूतनीकरण न करताच तांबे वैद्यकीय व्यवसाय कसा करतात? असा प्रश्न बोऱ्हाडे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार
‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ या पुस्तकात बालाजी तांबे यांनी गर्भलिंगनिदान कायद्याचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध, तसेच पुस्तकाचे प्रकाशक अभिजित पवार यांच्याविरुद्ध संगमनेर (जि. नगर) न्यायालयात गुन्हा दाखल झाला आहे. तांबे यांनी याविरोधात औरंगाबाद खंडपीठात दाद मागितल्यानंतर, न्यायालयाने हा गुन्हा रद्द केला. मात्र, या विरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. तसा निर्णय झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एम. सोनवणे यांनी सांगितले.