LMOTY 2022: ग्लोबल शिक्षण देणारा शिक्षक! बालाजी जाधव 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 08:39 PM2022-10-11T20:39:31+5:302022-10-11T20:40:36+5:30
Lokmat Maharashtrian of the Year Awards 2022: या पुरस्काराचे मानकरी शिक्षक बालाजी जाधव ठरले आहेत.
पहिली ते चौथीसाठी एकच शिक्षक असून सुद्धा अतिशय अभिनव व समृद्ध अशी शाळा तयार करून ती यशस्वी करण्याचे काम करणाऱ्या बालाजी जाधव यांचा यंदाचा शिक्षक या श्रेणीत 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या पुरस्कार सोहळा आज मुंबईत पार पडला. यावेळी या पुरस्कारासाठी शिक्षक या श्रेणीत पाच जणांना नामांकन मिळाले होते. या पुरस्काराचे मानकरी शिक्षक बालाजी जाधव ठरले आहेत.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा मंगळवारी मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. यामध्ये लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना या पुरस्कारानं गौरवण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांसह सेलिब्रिटींनी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली.
बालाजी जाधव यांची ब्लॉग, वेबसाईट, व्हिडीओ, फ्लीपबुक, क्यूआर कोडेड टेक्निक असे शब्द आणि गुगल, मायक्रोसॉफ्ट, फ्लिपग्रीड, ॲडॉब, माईनक्राफ्ट, नियरपोडसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून सन्मानित शिक्षक अशी ओळख आहे, सातारा जिल्ह्यातील कायम दुष्काळी भाग म्हणून ओळख असणाऱ्या माण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील बालाजी जाधव या शिक्षकाची. उपशिक्षक असणाऱ्या जाधव यांनी १६ वर्षे शिक्षणसेवा केली आहे.
मेंढपाळ, वीटभट्टी कामगार व रंगकाम करणाऱ्या पालकांच्या मुलांना ७ वर्षे स्पर्धा परीक्षेत राज्यस्तरावर गुणवत्ताधारक करण्याचे काम या छोट्याशा गावातल्या शिक्षकाने केले आहे. २५ लाखांच्या लोकसहभागातून त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत वीज, संगणक, टॅब, प्रोजेक्टर अशा सुविधा मिळवून दिल्या. याच्या माध्यमातून जगभरातील ४० देशांसोबत ग्रामीण शाळा जोडून ग्लोबल शिक्षण देणारा शिक्षक म्हणूनही आपली ओळख तयार केली. शाळेच्या पटसंख्येत चारपट वाढ झाली आहे.
पहिली ते चौथीसाठी एकच शिक्षक असूनसुद्धा अतिशय अभिनव व समृद्ध अशी शाळा तयार करून ती यशस्वी करण्याचे काम ते करत आहेत. उत्तम असे किचन गार्डन तयार करून शाळेसोबत गावालासुद्धा ऑर्गेनिक भाजीपाला पुरविणारा शिक्षक आहे. मल्टीस्कील डेव्हलपमेंट योजनेतून ग्रामीण भागातील मुलांना साबण, घड्याळ, वारली चित्र, पियानो वादन अशा कौशल्यात निपुण करण्याचे काम त्यांनी केले आहे. जगभरातील १२ देशांमधील शाळांमध्ये ते किल्ला निर्मितीचे धडेही देत आहेत. स्वत:च्या यू ट्यूब, वेबसाईटच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांना ज्ञान दिले आहे.