धुळे जिल्ह्यात उद्या बालाजी रथोत्सवांची धूम

By Admin | Published: October 10, 2016 09:30 PM2016-10-10T21:30:59+5:302016-10-10T21:30:59+5:30

शहरासह जिल्ह्यात शिरपूर, सोनगीर (ता.धुळे) व बेटावद (ता.शिंदखेडा) या ठिकाणी बुधवार १२ आॅक्टोबर रोजी बालाजी रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Balaji Rathhotsav's Dhoom in Dhule District tomorrow | धुळे जिल्ह्यात उद्या बालाजी रथोत्सवांची धूम

धुळे जिल्ह्यात उद्या बालाजी रथोत्सवांची धूम

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 10 -  शहरासह जिल्ह्यात शिरपूर, सोनगीर (ता.धुळे) व बेटावद (ता.शिंदखेडा) या ठिकाणी बुधवार १२ आॅक्टोबर रोजी बालाजी रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शिरपूर येथे बुधवारी खालचे गावातील प्रतितिरुपती बालाजी मंदिराचा तर गुरूवार १३ रोजी वरचे गावातील व्यंकटेश बालाजी मंदिराचा रथोत्सव साजरा होणार आहे.

धुळे बालाजी रथोत्सवास १३५ वर्षांची परंपरा
धुळे येथील खोलगल्लीतील श्री बालाजी मंदीर संस्थानतर्फे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पाशांकुशा एकादशीला रथोत्सव साजरा केला जातो. या रथोत्सवाला १३५ वर्षांची परंपरा लाभली आहे.
यंदाच्या उत्सवासाठी रथघरातून रथ बाहेर काढण्यात आला असून त्यास पाण्याने धुतल्यानंतर त्याच्या सजावटीला सुरुवात होते. बालाजी मंदिराचे व्यवस्थापन काकडा घराण्याकडे आहे. बुधवारी सकाळी उत्सवमूर्ती रथात विराजमान झाल्यानंतर आरती करण्यात येऊन रथ नेहमीच्या मार्गाने मार्गस्थ होईल.

शिरपुरात दोन रथोत्सव
शिरपूरचे वैभव वाढविणाऱ्या प्रतितिरूपती बालाजी मंदिरात व श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त रथोत्सव साजरे होणार आहेत. १२ रोजी खालचा गावाच्या तर १३ रोजी वरचा गावाच्या रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे़

प्रतितिरुपती बालाजी मंदिर
शहरात १४७ वर्षांची परंपरा लाभलेल्या खालचे गावातील प्रतितिरुपती बालाजी मंदिरातील जागृत देवस्थानाची ख्याती झाल्याने राज्यभरातील भाविकांची दर्शनासाठी या मंदिरात नेहमी गर्दी असते़ नवरात्रोत्सवानिमित्त १ ते ११ आॅक्टोबर दरम्यान वहनोत्सव, सप्तावरणपूजा व रथोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे़
१२ रोजी सकाळी ८़३५ वाजता रथोत्सवाची पूजा न्यायमूर्ती बी़सी़मोरे व तहसिलदार महेश शेलार यांच्या हस्ते रथाची पूजा करण्यात येणार आहे़ यावेळी आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, बालाजी संस्थानेच अध्यक्ष तथा नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, न्यायमूर्ती विवेक कुलकर्णी, न्यायमूर्ती एस़पी़बेदरकर, प्रांताधिकारी नितीन गावंडे, डीवायएसपी योगीराज शेवगण, पोनि दत्ता पवार आदी उपस्थित राहणार आहेत़

व्यंकटेश बालाजी संस्थान
शिरपूर शहरातील १४२ वर्षाची परंपरा लाभलेल्या श्री व्यंकटेश बालाजी संस्थान वरचे गांव या मंदिरात वहन, रथोत्सव व वर्धापन दिनानिमित्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे़ १३ रोजी सकाळी १०़४९ वाजता रथोत्सवाची पूजा द्वारकाधीश संस्थानचे हभप शंकर महाराज, सेंधव्याचे विकास अग्रवाल व शितल अग्रवाल यांच्या हस्ते होणार आहे़

सोनगीरला सर्वात उंच रथ
सोनगीर येथील बालाजी रथोत्सवाला बुधवारी दुपारी १२ वाजता प्रारंभ होईल. हा रथ राज्यातील सर्वात उंच ३३ फुटाचा आहे. १३५ वर्षापूर्वी सोनगीरला कै. वल्लभ काशिराम तांबट, हेमलाल गुजराथी, केशव देशपांडे यांनी रथोत्सव प्रारंभ केला. १९४० साली माधवराव तांबट यांनी रथासाठी मोठे घर आणि बालाजी मंदीर बांधून घेतले. १९१०, १९६० आणि १९७८ साली रथयात्रेदरम्यान गावात दुर्घटना झाल्याने काही वर्ष ही परंपरा खंडीत झाली होती. तब्बल १३ वर्षानंतर १९ आॅक्टोबर १९९१ रोजी पुन्हा या रथोत्सवाला प्रारंभ झाला. त्यासाठी डॉ.शशिकांत आपटे, चंद्रकांत गुजराथी, भटा धनगर, धोंडू महाजन, सीताराम मोरे, वाल्मिक केशव वाणी यांनी निधी उभा केला होता.

बेटावदचे ग्रामदैवत बालाजी
पुरातन काळापासून बेटावद येथे मोठे बालाजी व लहान बालाजी अशी दोन संस्थाने आहेत. संस्थानाच्या नवरात्रोत्सवास पहिला दिवसांपासून सुरुवात होऊन नऊ दिवसांपर्यंत चालणाऱ्या या उत्सवाची विजयादशमीला बालाजींच्या पालखीने सांगता होते. तर एकादशीला संपूर्ण बेटावदच्या नावलौकिकात भर टाकणारा व पंचक्रोशीतील प्रत्येकाच्या स्मरणात राहणारा रथोत्सव दरवर्षी उत्साहात संपन्न होतो. प्रचंड वजन व अत्यंत कसदार असे कोरीव काम असलेल्या काष्ठशिल्पाचा मोठ्या बालाजीचा रथ बेटावदकर ग्रामस्थांचे ‘भूषण’ आहे.

Web Title: Balaji Rathhotsav's Dhoom in Dhule District tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.