“बोलवा रे त्या सगळ्यांना!”; बालाजी तांबेंच्या तक्रारीवर बाळासाहेब ठाकरेंनी घेतली होती हातात काठी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 05:16 PM2021-08-10T17:16:51+5:302021-08-10T17:18:19+5:30

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही बालाजी तांबेंचा गाढा स्नेह होता.

balaji tambe passed away know memories of his friendship with balasaheb thackeray | “बोलवा रे त्या सगळ्यांना!”; बालाजी तांबेंच्या तक्रारीवर बाळासाहेब ठाकरेंनी घेतली होती हातात काठी

“बोलवा रे त्या सगळ्यांना!”; बालाजी तांबेंच्या तक्रारीवर बाळासाहेब ठाकरेंनी घेतली होती हातात काठी

googlenewsNext

मुंबई: आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. मागील आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनिल, संजय आणि सूना व नातवंडे असा परिवार आहे. राजकारण, समाजकारण, उद्योगजगत आणि सिनेविश्व अशा सर्वच क्षेत्रांमध्ये बालाजी तांबे यांचा मित्र परिवार होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही बालाजी तांबेंचा गाढा स्नेह होता. एका मुलाखतीत त्यांनी एक आठवण सांगितली होती. (balaji tambe passed away know memories of his friendship with balasaheb thackeray)

आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. डॉ. तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि रोजच्या जगण्यात आहार-विहार आणि विचारांच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन करणारे आरोग्यपूजक व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. अलीकडेच बालाजी तांबे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीची एक आठवण वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितली होती. 

बाळासाहेबांकडे केली होती तक्रार

बालाजी तांबे त्या काळी एमटीडीसीच्या एका बंगल्यात भाड्याने राहात होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी बालाजी तांबेंच्या बंगल्यावर मुक्काम केला. बाळासाहेब ठाकरे बालाजी तांबेंच्या बंगल्यावर राहाण्यासाठी आले असताना त्यांना सगळीकडे अस्वच्छता दिसली. बंगल्याच्या आजूबाजूला कचरापट्टी झाली होती. याबाबत त्यांनी बालाजी तांबे यांना विचारणा केली होती. तेव्हा बालाजी तांबेंनी आपली तक्रार त्यांच्यापुढे मांडली. 

पण कुणी काही ऐकतच नाही

मी त्यांना सगळे सांगितले. जिथे स्वच्छता आहे तिथे लक्ष्मी आहे, आम्ही स्वच्छतेवरच सगळी लक्ष्मी कमावली आहे वगैरे. पण कुणी काही ऐकतच नाही, असे बालाजी तांबेंनी बाळासाहेब ठाकरेंना सांगितले. बाळासाहेबांनी हे सगळे ऐकले आणि तडक एक काठीच हातात घेतली आणि फर्मान सोडले, बोलवा रे त्या सगळ्यांना. बाळासाहेबांचा पवित्रा पाहून बालाजी तांबेंनी विचारले, बाळासाहेब, तुमची युनियन आहे का इथे? त्यावर बाळासाहेब उत्तरले, माझे युनियन नाही. पण मी दाखवतो युनियनशिवाय कशी कामे होतात ते! एवढे बोलून बाळासाहेबांनी तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांची झडती घ्यायला सुरुवात केली. त्यांना दरडावले, की लगेच सगळीकडे स्वच्छता करा. मी जाईपर्यंत इथे सगळे हिरवे दिसले नाही, तर या काठीने एकेकाला दाखवतो, अशी आठवण बालाजी तांबे यांनी सांगितली होती. 

दरम्यान, बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ तसेच पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक होते. तब्बल पाच दशके त्यांनी आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीतोपचार यांचा प्रचार व प्रसार केला. आयुर्वेद केवळ राज्य किंवा देशभरापुरते मर्यादित न ठेवला त्यांनी जगभरात प्रसार केला आणि त्याचे महत्व पटवून दिले. 
 

Web Title: balaji tambe passed away know memories of his friendship with balasaheb thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.