‘समतोल’ बेघर मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा...
By Admin | Published: January 29, 2017 12:41 AM2017-01-29T00:41:08+5:302017-01-29T00:41:08+5:30
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर राज्यभरातून रोज शेकडो बेघर मुले येत असतात. मुंबईचे आकर्षण, घरातील वितुष्ट, सेलिब्रिटीला भेटण्याची ओढ अशी बरीच कारणे यामागे असतात.
- प्रवीण दाभोळकर
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर राज्यभरातून रोज शेकडो बेघर मुले येत असतात. मुंबईचे आकर्षण, घरातील वितुष्ट, सेलिब्रिटीला भेटण्याची ओढ अशी बरीच कारणे यामागे असतात. अशा वेळी त्यांना आईवडिलांच्या छत्रछायेत पाठवणे खूप जिकिरीचे काम असते. आपले घरदार सांभाळत, संपूर्ण आयुष्य अशा मुलांसाठी अर्पण करणे, हे अनोखे कार्य विजय जाधव यांच्यासारखे समाजसेवक ‘समतोल’ संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. या माध्यमातून गेल्या बारा वर्षांत ६,४१४ मुलांना स्वगृही पोहोचविण्यात आले आहे, पण आजही शासनातर्फे मिळणाऱ्या प्रोत्साहन, पाठिंब्याची समतोलला जास्त गरज आहे.
मुंबईत मिळेल तिथे राहायचे, मिळेल ते खायचे, अशी मानसिकता या मुलांनी आधीच तयार केलेली असते. त्यांची मन:स्थिती समजून घेताना, रेल्वे स्टेशनवर भटकणाऱ्या मुलांशी बोलणे, त्यांची मन:स्थिती समजून घेऊन त्यांचा विश्वास संपादन करणे हे खूप कठीण काम असते. घर सुटल्यामुळे सैरभैर झालेली, वाईट संगतीने व्यसनांच्या विळख्यात अडकलेली, कुमार्गाला लागलेली, आपल्याला हवी ती वस्तू नाही मिळाली, तर समोरच्या माणसाच्या जिवाचे बरेवाईट करायलाही मागेपुढे न बघणारी ती साधारण ७ ते १४ वयोगटांतली मुले या मनपरिवर्तन केंद्रात असतात. त्यांना मनपरिवर्तन केंद्रात दाखल करण्यापूर्वी पोलिसात त्यांची रीतसर नोंद केली जाते. दिवसभर भटकणे, कचरा वेचणे, व्यसन करणे, भीक मागणे, चोरी-लबाडी करणे अशा बेशिस्त दैनंदिन जीवनातून त्यांच्या आयुष्याला शिस्त लागण्यासाठी थोडा वेळ द्यावाच लागतो, हळूहळू ही मुले या वातावरणात रमून जातात. नियमित व्यायाम, प्रार्थना, मनोरंजनात्मक खेळ यांच्या माध्यमातून मुलांवर संस्कार केले जातात. समाजातील प्रतिष्ठित, विविध हुद्द्यांवर काम करणारी माणसे इथे भेटी देत आपले अनुभव सांगतात. या सर्वांचा मुलांवर सकारात्मक परिणाम होत असतो. दुसऱ्या बाजूला मुलांना पालकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू असतो. देशाचे भविष्य असलेली, पण आयुष्याचा रस्ता चुकलेले ही मुले समतोलच्या माध्यमातून पुन्हा मुख्य प्रवाहात सामील होतात. कल्याणपासून जवळ असणाऱ्या मामणोली इथे, हिंदू सेवा समितीच्या आवारात वर्षातून तीन वेळा ४५ दिवस हे शिबिर सुरू असते.
समतोल अॅप : ‘समतोल मित्र’ या अॅपच्या माध्यमातून मुलांचे फोटो आणि माहिती नागरिक समतोलपर्यंत पोहोचवू शकतात. संस्थेचे कार्यकर्ते वस्तुस्थितीची शहानिशा करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतील. ‘समतोल मित्र बना’ व समतोलच्या निगरानी पथकात दाखल होण्याचे आवाहन संस्थेतर्फे केले जात आहे. भुसावळ, संभाजीनगर, अकोला, पुणे, मुंबईतील सहा स्थानकांवर कार्यकर्ते समतोल कामांबाबत माहिती देत, स्थानिक लोकांना आवाहन करीत आहेत.
स्वावलंबनाकडे... : स्वयंरोजगाराच्या माध्यमातून इथल्या प्रत्येक मुलाला स्वावलंबी बनवण्याचा संस्थेचा हेतू आहे. साधारण १५ वर्षे वयोगटांतील मुले इथे असतात. शिक्षण कमी असल्याने, त्यांना रोजगार मिळणे कठीण असते. अशा वेळी त्यांना स्किल ट्रेनिंग देणे गरजेचे असते. समतोलच्या वास्तूत प्लंबर, इलेक्ट्रिशियन, टर्नर-फिटर, संगणक, शेती व्यवसाय असे प्रशिक्षण या मुलांना देण्याचा मानस विजय जाधव यांनी व्यक्त केला. एम. एस. डब्ल्यू.चे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी आपले घरदार सोडून मनपरिवर्तन केंद्रात अहोरात्र मेहनत घेत असतात.
२००४-०५ समतोलच काम सुरू झाले. २००७ पासून आतापर्यंत ७,८६० मुलांना स्वगृही पोहोचविण्याचे काम संस्थेने केले आहे. देशाचे भविष्य असलेल्या या मुलांसाठी अर्थसंकल्पात तरतूद नसणे ही गंभीर बाब आहे. यासाठी विशिष्ट निधी असेल, तात्पुरता निवारा, पुनर्वसन सुरळीत होऊ शकेल. महाराष्ट्रात या प्रकारची कोणतीच योजना सुरू नाही.
- विजय जाधव,
अध्यक्ष, समतोल