बाळासाहेबांनी ८ वेळा केली मृत्युपत्रात दुरुस्ती
By admin | Published: December 5, 2014 04:07 AM2014-12-05T04:07:46+5:302014-12-05T11:30:27+5:30
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९७-२०११ या काळात आठ वेळा मृत्युपत्रात दुरुस्ती केली होती, अशी माहिती उच्च न्यायालयात देण्यात आली़
मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९७-२०११ या काळात आठ वेळा मृत्युपत्रात दुरुस्ती केली होती, अशी माहिती उच्च न्यायालयात देण्यात आली़
अॅड़ एफ. डिसोजा यांनी उलटतपासणीत ही माहिती दिली़ बाळासाहेबांच्या मृत्युपत्रावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व जयदेव ठाकरे यांच्यात जुंपली असून यांची न्यायालयीन लढाई न्या़ गौतम पटेल यांच्यासमोर सुरू आहे़ अॅड़ डिसोजा यांनी बाळसाहेबांच्या मृत्युपत्राचा साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केली आहे़ त्यामुळे त्यांची साक्ष न्या़ पटेल यांच्यासमोर नोंदवण्यात आली़ त्यानंतर जयदेव यांच्या वकील सीमा सरनाईक यांनी अॅड़ डिसोजा यांची उलटतपासणी घेतली़
त्यात अॅड़ डिसोजा म्हणाले, एखाद्या नामवंत वकिलापेक्षा सर्वसाधारण वकिली करणाऱ्या वकिलाकडून मृत्युपत्र तयार करावे, अशी बाळासाहेबांची इच्छा होती़ त्यानुसारच अॅड़ जेरम सरदाना यांनी बाळासाहेबांचे मृत्युपत्र तयार केले़ त्याआधी याची सविस्तर माहिती बाळासाहेबांना देण्यात आली होती़ नंतर मृत्युपत्राचा मसुदा बाळासाहेब स्वत: वाचायचे़ अशा प्रकारे १९९७-२०११ या काळात मृत्युपत्रात आठ वेळा दुरुस्ती करण्यात आली़
मात्र बाळासाहेबांना मृत्युपत्राचा मसुदा वाचून दाखवला जात होता, असे प्रतिज्ञापत्र तुम्ही सादर केले असल्याकडे अॅड़ सरनाईक यांनी अॅड़ डिसोजा यांचे लक्ष वेधले़ त्यात चूक असून आता आपण दिलेली माहिती योग्य असल्याचा खुलासा अॅड़ डिसोजा यांनी केला़ यावरील पुढील सुनावणी १० डिसेंबरला होणार आहे़ (प्रतिनिधी)