बाळासाहेब सर्वश्रेष्ठ भारतीय व्यंगचित्रकार - राज ठाकरे

By admin | Published: May 4, 2016 05:36 PM2016-05-04T17:36:03+5:302016-05-04T21:31:40+5:30

बाळासाहेब ठाकरे हेच भारतातले आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रकार असल्याचे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.

Balasaheb Best Indian Cartoonist - Raj Thackeray | बाळासाहेब सर्वश्रेष्ठ भारतीय व्यंगचित्रकार - राज ठाकरे

बाळासाहेब सर्वश्रेष्ठ भारतीय व्यंगचित्रकार - राज ठाकरे

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - बाळासाहेब ठाकरे हेच भारतातले आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रकार असल्याचे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. उद्या पाच मे, जागतिक व्यंगचित्रकार दिन असून लोकमतचे राज ठाकरे हे गेस्ट एडिटर आहेत. त्यानिमित्त, लोकमतच्या संपादकीय टीमशी बोलताना राज यांनी व्यंगचित्रकला, व्यंगचित्रकार आणि भारतातलं कल्चर याबाबत आपले विचार मांडले. यावेळी बोलताना, आर. के. लक्ष्मण हे नि:संशय थोर व्यंगचित्रकार होते असे ते म्हणाले. मात्र, लक्ष्मण यांचा विनोद हा हसून बाजुला ठेवला जाण्याची शक्यता होती. तर बाळासाहेबांची व्यंगचित्रे विचार करायला भाग पाडायची आणि ती स्वभावत: तिखट होती असं राज म्हणाले.
 
उपजत ओढ हवी, अवांतर वाचन हवं!
 
काही गोष्टी या शिकवून येत नाहीत, त्या उपजत असाव्या लागतात, असं सांगताना राज ठाकरे यांनी नवोदीत व्यंगचित्रकारांनी भरपूर अवांतर वाचन करायला हवं असा सल्ला दिला. तरूण व्यंगचित्रकार राजकारणातलं किती वाचतात, अवांतर किती वाचतात हा संशोधनाचा विषय असल्याची टीकाही त्यांनी केली. अवांतर वाचन भरपूर असेल तरच कल्पना सुचू शकतात आणि ते नसेल तर विषयाची जुळवाजुळव करता येत नाही आणि कार्टून जमत नाही असं त्यांनी सांगितलं.
 
बाळासाहेबांना काय वाटायचं याचं दडपण असायचं!
 
व्यंगचित्र काढताना काही तास संपूर्ण एकांत लागतो असं राज म्हणाले. त्यामुळे सकाळच्या सगळ्या भेटीगाठी बंद करून एकाग्रता साधल्यावरच चांगलं व्यंगचित्र काढता येतं आणि त्यासाठी तीन ते सहा तास लागतात असं त्यांनी सांगितलं. अर्थात, व्यंगचित्र काढताना नेहमी बाळासाहेब काय बोलतिल, वडील काय म्हणतिल हे दडपण सतत असल्याचं राज म्हणाले. एका शब्दाचे चार अर्थ निघू शकतात, परंतु चित्र थेट बोलतं, त्यामुळे ते खूप जपून करावं लागतं असंही त्यांनी स्पष्ट केलं. व्यंगावर व्यंगचित्र काढायचं नाही अशी शिकवणही बाळासाहेबांची असून ती आपण कटाक्षानं पाळल्याचं राज म्हणाले.
 
व्यंगचित्रकारांनी भूमिका घ्यायला हवी!
 
श्रेष्ठ व्यंगचित्रकार डेव्हिड लो यांचं उदाहरण देताना राज ठाकरे यांनी व्यंगचित्रकारांनी स्पष्ट भूमिका घ्यायला हवी असं मत व्यक्त केलं. लोकांना भूमिका घेणारी वर्तमानपत्र आवडतात, असा दाखला देताना, वृत्तपत्रांनीही भूमिका घेणाऱ्या व्यंगचित्रकारांना प्रोत्साहन द्यायला हवं असं ते म्हणाले. डेव्हिड लो यांनी सातत्यानं हिटलर व मुसोलिनीविरोधी भूमिका घेतली. त्याचा परिणाम असा झाला की, हिटलर यांनी फर्मान काढलं की लो यांना जिवंत अथवा मृत अवस्थेत, पण आणा. ही भूमिका घेणाऱ्या व्यंगचित्रकारांची ताकद असते असं ठाकरे म्हणाले.
 
 
मी बाळासाहेब ठाकऱ्यांपैकी, कुशाभाऊ ठाकऱ्यांपैकी नाही!
 
राज ठाकरे यांच्या सहीतला ठाकरे या शब्दातली वळणं बाळासाहेबांची आठवण करून देतात, त्यांचीही सहीतली वळणं अशीच असायची असं सांगितल्यावर... राज ठाकरे यांनी मिश्किलपणे हे स्वाभाविक आहे असं सांगताना, मी बाळासाहेब ठाकऱ्यांपैकी, कुशाभाऊ ठाकऱ्यांपैकी नाही अशी मिश्किल टिप्पणी केली.
 
 
विदेशात व्यंगचित्रकलेचं कल्चर आहे, दुर्देवानं भारतात नाही!
 
युरोपमध्ये किंवा एकंदर विदेशात व्यंगचित्रकलेचं कल्चर रुजलेलं आहे असं राज म्हणाले. तिथं, चित्रकला हा विषय ऑप्शनला नसतो, असं सांगताना, लहानपणापासून मुलांवर कलेचे संस्कार होतात, त्यांची जडणघडण सौंदर्यदृष्टी निर्माण होत होते असं ते म्हणाले. लहानपणीच हे संस्कार झाले की मग पिढ्या फुकट जात नाहीत, असं त्यांनी सांगितलं.
 
 
(सर्व छायाचित्रे - दत्ता खेडेकर)
 
राज ठाकरे यांनी लोकमतच्या कारर्यालयाला भेट दिल्यानंतर मंगेश पाडगावकर यांचे व्यंगचित्र रेखाटले होते. पहा त्यांचा व्हिडिओ
 
 

Web Title: Balasaheb Best Indian Cartoonist - Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.