बाळासाहेब भोळे होते, त्यांनी सत्तेसाठी तडजोड केली नाही; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 11:10 AM2022-05-02T11:10:03+5:302022-05-02T11:10:20+5:30
बाळासाहेब ठाकरेंनी सत्तेसाठी कधीडी तडजोड केली नाही. राज ठाकरेंनीही केली नाही असं मनसेनं म्हटलं आहे.
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनाविरुद्ध मनसे असा सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे(MNS Raj Thackeray) यांनी प्रखर हिंदुत्वाचा आधार घेत राजकीय सभांमधून लोकांना साद घालण्यास सुरुवात केली आहे. गुढी पाडवा मेळावा, उत्तर सभा आणि त्यानंतर औरंगाबादमध्ये झालेल्या सभेनंतर राज ठाकरे शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जात असल्याचं सांगण्यात येत आहे. सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्व सोडलं असा आरोप विरोधकांकडून केला जातो त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तोफ डागली होती.
उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) म्हणाले होते की, बाळासाहेब भोळे होते. त्यांना भाजपाने वेळोवेळी फसवले. हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे मी भाजपासोबत धुर्त वागत आहे. माझ्या रक्तात हिंदुत्व भिनवलं आहे. पण हिंदुत्वाच्या आडून भाजपा त्यांचे डाव साधत होते आणि बाळासाहेब त्यांच्याकडे कानाडोळा करत होते. मी तसं करणार नाही. प्रखर हिंदुत्वाच्या आधारे देशात आणि राज्यात लोकांची माथी भडकवण्याचं राजकारण सुरू आहे असा आरोप त्यांनी केला.
उद्धव ठाकरेंच्या या विधानावरून मनसे नेते डॉ. वागिश सारस्वत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे जे बोलले ते खरे आहे. बाळासाहेब ठाकरे हिंदुह्दयसम्राट होते. त्यांचा वारसा कुणी सांभाळत नसल्याने राजसाहेब ठाकरे हा वारसा सांभाळत आहेत. तुम्ही सांभाळले असते तर ही वेळ आली नसती. बाळासाहेब ठाकरे भोळे होते तुम्ही नाही हे सत्य तुम्ही स्वीकारलं आहे. सत्तेसाठी तडजोड करणारे तुम्ही बनले आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी सत्तेसाठी कधीडी तडजोड केली नाही. राज ठाकरेंनीही केली नाही. त्यामुळे बाळासाहेबांना हिंदुह्द्रयसम्राट म्हणून ओळखले जाते तर राज ठाकरेंना हिंदुजननायक संबोधले जाते असा टोला मनसेने शिवसेनेला लगावला आहे.
उद्धव ठाकरे जी के बयान पर मनसे महासचिव डॉ वागीश सारस्वत का कटाक्ष! pic.twitter.com/127nQZADYs
— Dr.Vageesh Saraswat (@vageeshsaraswat) May 2, 2022
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
हे विकृत, सडलेले राजकारण कदापि महाराष्ट्राची संस्कृती नव्हती. महाराष्ट्र हे कदापि मान्य करणार नाही. निवडणुकीत लोक यांचा निर्णय करतील, पण सडक्या, कुजक्या आणि नासलेल्या विचारांचा घाणेरडेपणा राजकारणात आणला, तर लोकच यांना जाब विचारतील, की कोठे नेताय महाराष्ट्र आमचा. हा आमचा महाराष्ट्र नाही. आमचा साधुसंतांचा, शिवरायांचा महाराष्ट्र असा नाहीये. असे सडके, नासके, सुडबुद्धीचे राजकारण मला किंवा महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित नाही. तेही कशासाठी तर केवळ मला पाहिजे, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. लोकसत्ता आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.