Balasaheb Thackeray Birth Anniversary ...अन् बाळासाहेबांनी केलं राज ठाकरेंचं दुसरं बारसं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 10:34 AM2019-01-23T10:34:12+5:302019-01-23T10:36:12+5:30

राज ठाकरेंनी सांगितलेला दुसऱ्या नामकरणाचा मजेशीर किस्सा

balasaheb thackeray changed my name from swararaj thackeray says mns chief raj thackeray | Balasaheb Thackeray Birth Anniversary ...अन् बाळासाहेबांनी केलं राज ठाकरेंचं दुसरं बारसं

Balasaheb Thackeray Birth Anniversary ...अन् बाळासाहेबांनी केलं राज ठाकरेंचं दुसरं बारसं

googlenewsNext

मुंबई: मनसेप्रमुखराज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातलं नातं संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. राज ठाकरेंनी शिवसेनेला रामराम करत मनसेची स्थापना केली. मात्र तरीही कायम बाळासाहेबच राज ठाकरेंचे दैवत राहिले. माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे, हे राज ठाकरेंचे शिवसेनेला सोठचिठ्ठी देतानाचे शब्द होते. राज ठाकरे बाळासाहेबांच्या सावलीत लहानाचे मोठे झाले. विशेष म्हणजे बाळासाहेबांनीच राज ठाकरेंचं दुसरं बारसं केलं होतं. अन्यथा आज राज ठाकरे वेगळ्या नावानं ओळखले गेले असते. गेल्या वर्षी राज यांनी त्यांच्या दुसऱ्या नामकरणाचा किस्सा पुण्यातल्या एका कार्यक्रमात सांगितला होता. 

'माझं आधीचं नाव स्वरराज होतं. मात्र बाळासाहेबांच्या सांगण्यावरुन मी राज या नावानं व्यंगचित्र काढू लागलो, अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी त्यांच्या दुसऱ्या बारशाची गंमत सांगितली. 'माझे वडील संगीतकार होते. त्यामुळे मुलगा संगीत क्षेत्रात काहीतरी करेल, असं त्यांना वाटत होतं. मात्र मला वेगळेच 'राग' येऊ लागले, अशी आठवण राज ठाकरे यांनी सांगितली. ती ऐकताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या स्वरराज करंडक स्पर्धेला उपस्थित असताना राज ठाकरे यांनी तरुणाशी संवाद साधला होता. 

'मी पाळण्यात असताना वडिलांनी माझं नाव स्वरराज ठेवलं. वडील संगीतकार असल्यानं मुलगादेखील पुढे जाऊन संगीत क्षेत्रात काहीतरी करेल, या विचारानं वडिलांनी माझं नामकरण केलं. मात्र नंतर मला वेगळेच राग येऊ लागले आणि त्या रागाचं परिवर्तन वेगळ्याच ठिकाणी झालं. मात्र अजूनही स्वरराज हेच नाव माझ्या पासपोर्टवर आहे,' असं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं.

आपल्याला राज ठाकरे हे नाव बाळासाहेबांनी दिलं, अशी आठवण त्यांनी सांगितली. 'मी सुरुवातीला स्वरराज ठाकरे नावानं व्यंगचित्रं काढायचो. व्यंगचित्रातील माझ्या कारकिर्दीची सुरुवात त्याच नावानं झाली होती. मात्र सहा-आठ महिन्यांतच मला बाळासाहेबांनी नावात बदल करायला सांगितला. मी व्यंगचित्राच्या क्षेत्रातील कारकीर्द बाळ ठाकरे नावानं सुरू केली. त्यामुळे तू राज ठाकरे नावानं व्यंगचित्रं काढ, असं बाळासाहेबांनी मला सांगितलं आणि माझं बारसं झालं,' अशी आठवण राज ठाकरेंनी सांगताच उपस्थितांमध्ये हास्याची कारंजी उडाली होती.

माझ्या घरात सर्वांची नावं संगीतातल्या विविध रागांवरुनच ठेवण्यात आली आहेत, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. 'माझ्या आईचं नाव मधुवंती आहे. तर बहिणीचं नाव जयजयवंती आहे. त्यामुळे माझं स्वरराज ठेवलं. मुलगा संगीतात कारकीर्द करेल, असं कुटुंबीयांनी वाटलं होतं. पण त्या रागाचं पुढे काहीच झालं नाही,' असं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं. 
 

Web Title: balasaheb thackeray changed my name from swararaj thackeray says mns chief raj thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.