Champa Singh Thapa : नेपाळमधलं गाव ते 'मातोश्री'; वाचा, चंपासिंह थापा कसे बनले बाळासाहेबांचे विश्वासू सेवक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 06:18 PM2022-09-26T18:18:27+5:302022-09-26T18:39:27+5:30
Champa Singh Thapa : दसरा मेळाव्यासह अनेक जाहीर सभांमध्ये बाळासाहेबांच्या आसनामागे थापा विनम्रपणे उभे असल्याचं अनेकांनी पाहिलंय. त्यांना पाणी देणं, नॅपकिन देणं, चालताना हात धरून आधार देणं ही जबाबदारी थापा अगदी चोख बजावत.
बाळासाहेब ठाकरे यांना सावलीसारखी साथ देणारे 'सेवक' चंपासिंह थापा (Champa Singh Thapa) यांनी आता शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू अशी ओळख असलेले चंपासिंह थापा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. दसरा मेळाव्यासह अनेक जाहीर सभांमध्ये बाळासाहेबांच्या आसनामागे थापा विनम्रपणे उभे असल्याचं अनेकांनी पाहिलंय. त्यांना पाणी देणं, नॅपकिन देणं, चालताना हात धरून आधार देणं ही जबाबदारी थापा अगदी चोख बजावत.
चंपासिंह थापा हे साधारण 40 वर्षांपूर्वी नेपाळमधून आले होते. गोरेगावमध्ये छोटी-मोठी कामं करत असताना भांडूपमधील नगरसेवक के. टी. थापा यांच्यासह चंपासिह थापा मातोश्रीवर गेले होते. यानंतर ते बाळासाहेबांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यासोबत होते. मातोश्रीत आल्यानंतर बाळासाहेबांचा दिनक्रम सांभाळण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केलं आणि मनापासून सेवा करणारे चंपासिंह थापा हे बाळासाहेबांचे विश्वासू सेवक झाले. त्यांच्या जेवणाची, औषधाच्या वेळांची, सभांची आणि इतरही अनेक गोष्टींची नीट काळजी घेतली आणि थोड्याच दिवसात ते मातोश्रीचे एक सदस्य झाले.
उद्धव ठाकरेंना धक्का! बाळासाहेबांचे निकटवर्तीय चंपासिंह थापा यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश#ChampasinghThapa#Shivsena#EknathShindehttps://t.co/HbSHyIkHY7
— Lokmat (@lokmat) September 26, 2022
नेपाळमध्ये शिवसेनेची उभारणी करण्यात थापा यांची भूमिका महत्त्वाची
थापा बाळासाहेबांची जिवापाड काळजी घेत होते. मांसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या निधनानंतर बाळासाहेब हळवे झाले तेव्हा थापा यांनी त्यांना मोठा भावनिक आधार दिला होता. मातोश्रीवर बाळासाहेबांच्या खोलीशेजारीच थापाची लहानशी खोली होती. थापा यांचे कुटुंब नेपाळमध्ये असून त्यांना दोन मुलं आहेत. नेपाळमध्ये शिवसेनेची उभारणी करण्यात थापा यांची भूमिका महत्त्वाची होती.
मातोश्रीसोबत चांगले संबंध
पहिल्यापासून साहेबांसोबत होतो. नेहमीच बरोबर असायचो. मातोश्रीसोबत चांगले संबंध आहेत. साहेबांसोबत एवढे वर्षे राहिलो. यापुढेही आहे असं थापा यांनी काही महिन्यांपूर्वीच सांगितलं होतं. त्यानंतर आता शिंदे गटात प्रवेश केला आहे. नवरात्रीच्या निमित्ताने थापा ठाण्यामध्ये देवीच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे साहेबांना भेटलो. पहिल्यापासून शिवसेनेची सेवा करत होतो आता एकनाथ शिंदे साहेबांसोबत सेवा करणार असल्याचं थापा यांनी म्हटलं आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू अशी ओळख असलेले चंपासिंह थापा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे.#ChampasinghThapa#Shivsena#EknathShindepic.twitter.com/16G4g70rZp
— Lokmat (@lokmat) September 26, 2022