Anil Parab : “नोटांवर बाळासाहेबांचा फोटो असायला पाहिजे”; ठाकरे गटातील नेत्याने सांगितलं नेमकं ‘कारण’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 05:11 PM2022-10-27T17:11:09+5:302022-10-27T17:19:13+5:30
Anil Parab : ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी देखील नोटांवरील फोटोच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. “मला विचाराल कोणाचा फोटो असायला पाहिजे तर मी सांगेन नोटांवर बाळासाहेबांचा फोटो असायला पाहिजे” असं म्हटलं आहे.
गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा होत आहे. नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो हटवण्याचा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा केजरीवाल पुढे घेऊन जातायेत, असे संजय निरुपम यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे भाजपा नेत्यांनीही आता विविध नाव घेत नोटांवर फोटो छापण्याची मागणी केली आहे. भाजपाचे आमदार राम कदम यांनी केलेलं ट्विटही चर्चेत आलं आहे.
राम कदम यांनी फोटो ट्विट केले असून त्यामध्ये ४ नोटांचे फोटो आहेत. त्यात वि.दा. सावकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही फोटो नोटांवर छापण्याची मागणी केली आहे. यानंतर आता ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी देखील नोटांवरील फोटोच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. “मला विचाराल कोणाचा फोटो असायला पाहिजे तर मी तर सांगेन नोटांवर बाळासाहेबांचा फोटो असायला पाहिजे” असं म्हटलं आहे.
"बाळासाहेबांचा फोटो असायला पाहिजे"
अनिल परब यांनी “नोटांवर फोटो कोणता हवा यासाठी शिवसेनेने कुठलीही अधिकृत मागणी केलेली नाही. शिवसेना हा गरिबांचा पक्ष आहे, त्यामुळे या सगळ्या भानगडीत शिवसेना जात नाही. परंतु जर मला विचाराल कोणाचा फोटो असायला पाहिजे तर मी सांगेन बाळासाहेबांचा असायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की माझा नेता असायला पाहिजे असं जर प्रत्येकाला वाटत असेल, तर मी तर शिवसेनेचा आहे. मला तर असंच वाटेल की बाळासाहेबांचा फोटो असायला पाहिजे. पण माझ्या वाटण्याला काही महत्त्व नाही.”
"हे जाणूनबुजून निर्माण केलेले वाद"
“शेवटी हे सरकार ठरवत असतं की त्यावर काय असायला पाहिजे, हे जाणूनबुजून निर्माण केलेले वाद आहेत” असं म्हटलं आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. अरविंद केजरीवाल यांच्या मागणीनंतर आता भाजपा आमदार नितेश राणे यांनीही ट्विट करून नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो लावावा अशी मागणी केली आहे. त्यांनी शिवाजी महाराजांचा फोटो असलेल्या नोटेचा फोटोही ट्विट केला आहे. याबाबत नितेश राणे म्हणाले की, ही माझी वैयक्तिक भावना आहे. शिवप्रेमी म्हणून मी व्यक्त झालो आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना देशात नाही तर जगात मान्यता आहे. अशा महापुरुषाचा फोटो नोटांवर टाकला तर योग्य राहील ही माझी भावना आहे असं त्यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"