हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग प्रगतीपथावर; १ मे २०२२ पर्यंत वाहतुकीसाठी खुला
By प्रविण मरगळे | Published: October 8, 2020 03:29 PM2020-10-08T15:29:03+5:302020-10-08T15:32:49+5:30
Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg News: समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी एकूण ५५ हजार ३३२ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यापैकी ४० हजार कोटी रुपये अभियांत्रिकी कामांवर खर्च होणार आहे.
मुंबई - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे बांधकाम वेगात सुरू असून १ मे २०२२ पर्यंत समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला असेल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी गुरुवारी दिली. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या बांधकामाची सद्यःस्थिती दर्शवणारी ध्वनीचित्रफीत सादर केली.
यावेळी राधेश्याम मोपलवार म्हणाले की, समृद्धी महामार्गाचे बांधकाम वेगात सुरू आहे. ७०१ किमी लांबीपैकी आतापर्यंत १५२.१७ किमी लांबीच्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले असून शिर्डीपर्यंतचा ५२० किमी लांबीचा पट्टा १ मे २०२१ पर्यंत तर ६२३ किमी लांबीचा इगतपुरीपर्यंतचा मार्ग १ डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण केला जाईल. तर संपूर्ण समृद्धी महामार्ग १ मे २०२२ पर्यंत वाहतुकीसाठी खुला असेल असं त्यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आणि डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार उपस्थित होते.
सहा शहरांच्या कामाला गती
समृद्धी महामार्गालगत १९ नव्या शहरांची उभारणी केली जाणार असून ८ शहरांचा विकास आराखडा तयार असल्याचे मोपलवार म्हणाले. ८ पैकी ६ शहरांसाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पुढील वर्षीच्या जूनपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. शहरांमध्ये विविध प्रकारच्या उद्योगांना प्राधान्य देण्यात येणार असून एक लाख लोकसंख्या सामावू शकेल अशा प्रकारची शहराची रचना असेल
लॉकडाऊनमुळे महामार्गाच्या कामाला विलंब
कोरोना महामारीमुळे सगळीकडे लॉकडाऊन सुरु झाले, त्यापूर्वी समृद्धी महामार्गाच्या बांधकामात १८ हजार कामगार काम करत होते. लॉकडाऊननंतर अनेक जण गावी गेल्याने या कालावधीत समृद्धी महामार्ग बांधकामाचा वेग थोडा मंदावला होता. परंतु आता गेल्या दोन महिन्यांपासून कामगार पुन्हा कामावर परतू लागले असून २० हजारांहून अधिक कामगार या प्रकल्पात काम करत आहेत.
इलेक्ट्रीक वाहनांसाठी चार्जिंगची सुविधा
समृद्धी महामार्गावर दर ४० ते ५० किमी मार्गावर दोन्ही बाजूला वेसाइड ऍमेनिटीजची उभारणी करण्यात येणार असून भविष्यातील गरज लक्षात घेऊन या प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रीक वाहनांच्या चार्जिंगसाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच महामार्गावर इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) ही सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सुविधेच्या माध्यमातून वाहनांचा वेग, लेन कटिंग, वाहन ब्रेकडाऊन होणे इत्यादींवर लक्ष ठेवले जाणार आहे.
समृद्धी महामार्गासाठी एकूण ५५ हजार कोटी खर्च अपेक्षित
समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी एकूण ५५ हजार ३३२ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यापैकी ४० हजार कोटी रुपये अभियांत्रिकी कामांवर खर्च होणार आहे. महामार्गावर ८ बोगदे, व्हायाडक्ट्स, रेल्वेमार्गावरील पूल, नदीवरील पूल इत्यादी बांधकामाचा समावेश असेल. वन्यप्राण्यांच्या संचारावर गदा येऊ नये यासाठी समृद्धी महामार्गावर वन्यजीवांसाठी अंडरपास आणि ओव्हरपास बांधण्यात येणार असल्याचंही मोपलवार यांनी सांगितले.
कसा असेल हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग?
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी लांबीचा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग आहे. दहा जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना हा महामार्ग जोडत जाणार आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर आणि मुंबई या दोन शहरांमधील अंतर ८ तासांत पूर्ण करता येणार आहे. महामार्गावर १९ ठिकाणी शहरांची (कृषी समृद्धी केंद्रे) उभारणी केली जाणार आहे.