बाळासाहेब, आम्हाला गजकर्ण झालाय हो...; ते विधान आणि आजची शिवसेना....
By संदीप प्रधान | Published: December 12, 2022 12:17 PM2022-12-12T12:17:05+5:302022-12-12T12:17:27+5:30
राम मराठे महोत्सव मुळात नाट्य परिषदेच्या कल्पनेतून राबविला जाऊ लागला. या परिषदेचे अध्यक्ष गेली काही वर्षे शिवसेना ठाकरे गटात असलेले खा. राजन विचारे आहेत. महापालिकेवर अर्थातच एकनाथ शिंदे समर्थकांचा वरचष्मा आहे. त्यामुळे महापालिकेच्या सहकार्याने साजऱ्या होणाऱ्या या महोत्सवातून परिषदेला बाहेरचा रस्ता दाखवला गेला.
- संदीप प्रधान,
वरिष्ठ सहायक संपादक
दिवंगत शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या मेळाव्यात व मॅरेथॉन मुलाखतींमध्ये ते कायम ‘राजकारण म्हणजे गजकर्ण, मी माझ्या पक्षात याची लागण होऊ देणार नाही,’ असे बजावत. बाळासाहेबांच्या पश्चात शिवसेनेत राजकीय गजकर्ण बळावला. ठाण्यात गेली २६ वर्षे अव्याहत आयोजित केल्या जात असलेल्या पं. राम मराठे महोत्सवाचे आयोजन करणारी नाट्य परिषदेची ठाणे शाखा व महापालिका यांना याची लागण होण्याचे काहीच कारण नव्हते; परंतु दुर्दैवाने राजकारणातील गजकर्णाची लागण समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात पसरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे संगीताची मैफल ऐकताना किंवा साहित्यिक सोहळ्यात सारेच राजकारणामुळे कराकरा खाजवताना दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका.
राम मराठे महोत्सव मुळात नाट्य परिषदेच्या कल्पनेतून राबविला जाऊ लागला. या परिषदेचे अध्यक्ष गेली काही वर्षे शिवसेना ठाकरे गटात असलेले खा. राजन विचारे आहेत. महापालिकेवर अर्थातच एकनाथ शिंदे समर्थकांचा वरचष्मा आहे. त्यामुळे महापालिकेच्या सहकार्याने साजऱ्या होणाऱ्या या महोत्सवातून परिषदेला बाहेरचा रस्ता दाखवला गेला.
मराठे हे मूळचे ठाणेकर. शिवसेनेचे माजी खा. प्रकाश परांजपे यांचे वडील वि. रा. परांजपे हे नाट्य परिषदेेचे अध्वर्यू होते. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठाण्यात संगीत महोत्सव साजरा करण्याची कल्पना मांडली. परांजपे यांचे पुत्र प्रकाश हे नगरसेवक होते. त्यांनी ठराव मांडून आर्थिक पाठबळ प्राप्त करून दिले. प्रारंभी या सोहळ्याकरिता तिकीट लावले होते. एका वर्षी तत्कालीन महापौर अशोक वैती यांनी हा महोत्सव मोफत आयोजित करण्याची ‘रेवडी’ ठाणेकरांच्या हातावर ठेवली. त्यानंतर या महोत्सवाची रया गेली. नगरसेवक व अधिकाऱ्यांसाठी पहिल्या चार रांगा राखीव असायच्या. त्यांच्यापैकी कुणी फिरकायचे नाही. त्यामुळे बिच्चारे दिग्गज कलाकार रिकाम्या खुर्च्यांकडे पाहत कार्यक्रम करायचे.
महापालिका प्रशासनाचे म्हणणे असे आहे की, गेल्या काही वर्षांत महापालिकाच महोत्सवाची सर्व जबाबदारी पार पाडत होती; परंतु नाट्य परिषद आपले ब्रँडिंग करीत होती. त्यामुळे परिषदेला आयोजनातून वगळले; परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. विचारे यांच्याऐवजी नाट्य परिषदेचे अध्यक्ष होण्याची नरेश म्हस्के यांची महत्त्वाकांक्षा आहे. त्यात चूक काहीच नाही; परंतु त्याकरिता त्यांनी निवडणूक लढवणे हाच पर्याय रास्त आहे. पर्यायी नाट्य परिषद उभारण्याचाही प्रयत्न ठाण्यात सुरू असल्याची चर्चा आहे. राजकीय गजकर्ण वाढल्याने ठाण्यात दिवाळी पहाटचे यंदा दोन कार्यक्रम झाले. कदाचित उद्या दोन नाट्य परिषदा होतील. दोन वेगवेगळी गडकरी रंगायतन उभारली जातील, दोन दादोजी कोंडदेव स्टेडियमचा आग्रह धरला जाईल. राजकारणातील हा गजकर्ण ठाण्यातील साहित्य, नाट्य, कला. क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात फैलावल्याचे दिसेल. बाळासाहेबांनी गजकर्णाचे सूतोवाच केले; मात्र त्यावरील मलम सांगितलेले नाही, हे ठाणेकरांचे दुर्दैव.