...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 12:27 PM2024-11-05T12:27:46+5:302024-11-05T12:28:44+5:30
राज ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाबद्दल भाष्य केले. त्यावर संजय राऊत यांनी स्वतःची भूमिका मांडली.
Raj Thackeray Sanjay Raut: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर दिल्या गेलेल्या निर्णयावर भाष्य केले. शिवसेना बाळासाहेबांची संपत्ती आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची, असे ते म्हणाले. त्यावरून खासदार संजय राऊतांनीराज ठाकरेंना खोचक शब्दांत उत्तर दिले.
मुंबईत संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांचं राज ठाकरेंनी केलेल्या विधानाकडे लक्ष वेधण्यात आलं. उत्तर देताना संजय राऊत राज ठाकरेंवर संतापल्याचे पाहायला मिळाले.
शिवसेना आणि धनुष्यबाण ही बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. तसेच, घड्याळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही शरद पवारांची प्रॉपर्टी आहे, असे विधान राज ठाकरेंनी केले. त्यावर संजय राऊत म्हणाले, "मग आम्ही इतके दिवस काय म्हणत होतो. आम्ही काय वेगळं सांगत होतो का? बाळासाहेब ठाकरेंचीच प्रॉपर्टी आहे. किंवा शरद पवारांची प्रॉपर्टी आहे. शरद पवारांच्या हयातीत ती अजित पवारांना देणारा निवडणूक आयोग कोण?", असा सवाल संजय राऊत यांनी केला.
"राज ठाकरेंनी गॅलरीत पाहू नये, सभागृहात पाहावं"
"बाळासाहेब ठाकरेंची जी प्रॉपर्टी आहे, जनता, शिवसेना, शिवसैनिक हे एकनाथ शिंदेंच्या घशात घालणारे मोदी-शाह कोण? असा आमचा सवाल आहे. त्याच मोदी-शाहांची तळी आज आमचे राज ठाकरे उचलत आहेत. मूळात त्यांचा हल्ला मोदी-शाहांवर पाहिजे. त्यांनी गॅलरीत बघून बोलू नये, त्यांनी सभागृहात काय चाललंय ते पाहावं", असा खोचक टोला राऊतांनी राज ठाकरेंना लगावला.
"बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी गुजरातच्या व्यापाऱ्यांनी एकनाथ शिंदेला परस्पर दिली. जशी मुंबई पोर्तुगिजांनी ब्रिटिशांना दिली, आहेर म्हणून. त्या पद्धतीने मोदी-शाह या दोन व्यापाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही आहेर म्हणून शिंदेंना दिली. राज ठाकरेंनी यावर बोलायला पाहिजे", असे संजय राऊत म्हणाले.
यासारखं पाप नाही; राऊत ठाकरेंना काय बोलले?
"बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे, हे सांगण्याची गरज नाही. त्यासाठी राज ठाकरेंच्या प्रमाणपत्राची गरज नाही. आज तुम्ही त्यांचा प्रचार करता आहात. आज ज्यांना तु्म्ही आपले नेते मानता; फडणवीस, अमित शाह, मोदीजी त्यांनी बाळासाहेबांची प्रॉपर्टी बेकायदेशीपणे एकनाथ शिंदेंना दिली आहे. त्या भाजपचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात करायला तुम्ही निघाला आहात, यासारखं पाप नाही. आणि बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाही", अशी टीका राऊतांनी राज ठाकरेंवर केली.